पाथर्डी तालुक्यातील लोहसर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पवळवाडी येथील साळखोरी पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्चुनही बांधकामातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे.त्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

साळखोरी पाझर तलावाला पूर्वी थोडीशी गळती होती म्हणून शेतकऱ्यांनी या तलावाच्या दुरुस्तीची मागणी केली.मृदा व जलसंधारण विभागाने यासाठी तब्बल ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.

ठेकेदाराने काम पूर्ण केले आणि मागील पावसाळ्यात तलाव तुडूंब भरला परंतु तलावाची गळती बंद न होता ती चारपट वाढल्याने पवळवाडीच्या शेतकऱ्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.

३३ लाख खर्च करूनही पाणी गळती वाढल्याने या कामाची निकृष्टता स्पष्टपणे दिसून आली आहे.दर्जाहीन काम झाल्याने या यावर्षीच्या पावसाळ्यात पाण्याने तुडूंब भरलेला तलाव कोरडाठाक झाला आहे.

या पाझर तलाव क्षेत्रात जवळपास दीडशे हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र ओलिता खाली आहे.दरवर्षी तलाव भरल्यांनतर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत पाणी साठलेले असायचे.यावर्षी पावसाळा चांगला होऊनही या भागातील शेतकरी पीक घेण्यासाठी पाणी शिल्लक नसल्याने हवालदिल झाले आहेत.

दरम्यान,नव्याने या तलावाचा वांबोरी चारी टप्पा दोनमध्ये आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नामुळे समावेश झाला आहे.त्यामुळे या तलावातील पाण्यामुळे पवळवाडीसह लोहसर येथील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

आमदार कर्डिले यांच्या प्रयत्नामुळे वांबोरी चारी टप्पा दोनसाठी ९२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाला देखील आता लवकरच सुरुवात होणार आहे.

साळखोरी तलावाच्या दुरुस्तीसाठी शेतकरी अथवा लोहसर ग्रामपंचायतची मागणी नसतानाही तत्कालीन लोकप्रतिनिधीने संगनमताने अधिकारी, ठेकेदार यांना हाताशी धरून या कामात मोठा गैरव्यवहार केला आहे. या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा सरपंच अनिल गीते यांनी दिला आहे.