अहिल्यानगर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या सदस्यांची मुदत संपल्याने या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.यातील तीन ग्रामपंचायतींवर अडीच वर्षांपासून प्रशासकराज सुरू आहे.तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींच्या सदस्यांची मुदत ८ जानेवारी २०२४ रोजीच संपली.त्याला आता एक वर्ष पूर्ण होत आले आहे.
निवडणुका घेण्याबाबत अद्याप आयोगाकडून हिरवा कंदील न मिळाल्याने या गावांमध्ये जि.प.प्रशासनाने प्रशासकांची नियुक्ती केली आहे.
प्रशासकांनी या गावांचा पदभारही स्वीकारला आहे.तालुक्यातील आव्हाडवाडी, भोयरे पठार, भोयरे खुर्द, मजले चिंचोली, पारेवाडी, पारगाव (भातोडी), बुरुडगाव या ग्रामपंचायत सदस्यांची मुदत एक वर्षापूर्वीच संपली आहे.मात्र वर्षभरात या ग्रामपंचायतींच्या निवडणुकाच न झाल्याने या गावांमध्ये जानेवारीपासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुक्यातील नागरदेवळे, बाराबाभळी व वडारवाडी या तीन ग्रामपंचायत मिळून महाआघाडी सरकारने नगरपालिका करण्याची अधिसूचना काढली.यामुळे या गावातील ग्रामपंचायती विसर्जित करण्यात आल्या होत्या.
मात्र,महायुतीचे सरकार आल्यानंतर या तीन गावांची मिळून नगरपालिका करण्याची अधिसूचना रद्द केली.यामुळे या गावात ग्रामपंचायत की नगरपालिका,असा प्रशासकीय वाद सुरू झाल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले.
न्यायालयीन प्रक्रियेमुळे या गावांमध्ये अडीच वर्षांपासून प्रशासक नेमण्यात आला आहे.आता पुन्हा महायुतीचे सरकार आल्याने हा गुंता सुटेल,असा विश्वास या तीन गावांतील ग्रामस्थांना आहे.
तालुक्यातील १० ग्रामपंचायतींवर प्रशासक असल्याने विविध योजनांमधून मिळणारा ग्रामविकास निधी, इतर शासकीय निधी मिळणे दुरापास्त झाले आहे.याचा परिणाम गावातील विकासकामांवर होत आहे.
बुरुडगाव ग्रामपंचायतीची मुदत संपून वर्ष झाले तरी निवडणूक झाली नाही.एका वर्षापासून गाव प्रशासकाच्या ताब्यात आहे. कुठलाच निधी मिळत नसल्याने सध्या गावात मूलभूत समस्या वाढल्या आहेत असे बुरूडगावचे माजी सरपंच बापूसाहेब कुलट यांनी सांगितले आहे.
नागरदेवळेसह बाराबाभळी व वडारवाडी गावात अनेक दिवसांपासून प्रशासक आहे.प्रशासकामुळे गावाच्या विकासकामांवर परिणाम होत आहे.प्रशासकावर काम करण्याच्या मर्यादा असतात.
त्यातच न्यायालयीन प्रक्रियेमुळे या गावांना १५व्या वित्त आयोगाचा निधी मिळाला नाही.यामुळे गावातील विकासकामांची पिछेहाट होत आहे असे नागरदेवळे गावचे माजी सरपंच राम पानमळकर यांनी सांगितले आहे.