पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगराच्या कडेला असणाऱ्या डोंगरवाडी प्राथमिक शाळेच्या खोल्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे.वर्गखोल्या धोकादायक बनल्या आहेत.या शाळेतील दोन वर्ग खोल्या मंजूर झाल्या आहेत.
अशा धोकादायक वर्ग खोल्यांमध्येच मुले शिक्षण घेत आहेत.मात्र शाळेच्या जागेतच अतिक्रमण झाल्याने खोल्या बांधण्यास अडचण निर्माण झाली आहे.डोंगरवाडीतील जिल्हा प्राथमिक शाळेस दोनच खोल्या आहेत.त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे.
या धोकादायक इमारतीमध्ये येथील चिमुकले प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत.सरपंच, ग्रामस्थांनी या शाळेस नवीन खोल्यांची मागणी केली असता, या शाळेला दोन खोल्या मंजूरही झाल्या आहेत.मात्र शाळेच्या जागेतच एका शेतकऱ्याने अतिक्रमण केल्याने या प्राथमिक शाळेस जागाच राहिली नाही.
या शाळा खोल्यांचा निधी तसाच पडून आहे.या अतिक्रमणासंबंधी संबंधित शिक्षकांनी व ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या शाळेच्या जागेची मोजणी करून शाळेची कागदोपत्री असणारी जागा शाळेला मिळावी,अशी मागणी केली आहे.
याविषयी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करूनही अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. शाळेच्या पूर्वीच्या खोल्यांचा अहवालही देण्यात आला आहे.अशा धोकादायक खोल्यांत या गावातील चिमुकले शिक्षण घेत आहेत.
त्यांच्या जीवितास धोका असल्याचे दिसत असूनही वरिष्ठ अधिकारी याबाबत कोणतीच दखल घेत नसल्याने शाळेतील मुलांच्या पालकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.याबाबत ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
डोंगरवाडी जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या धोकादायक बनल्या असून शाळेसाठी दोन नवीन खोल्या मंजूर झाल्या आहेत. मात्र शाळेच्या जागेतच अतिक्रमण झाल्याने शाळेला खोल्या बांधण्यास जागा नाही.त्यामुळे आठ दिवसांत शाळेचे अतिक्रमण काढले नाही,तर शाळेत मुलांना बसू देणार नाही असे सरपंच उद्धव गिते यांनी सांगितले आहे.