नोव्हेंबर,डिसेंबर महिना म्हटले की कांदा, ऊस लागवडीसह गहू, हरभरा, ज्वारी पिकाच्या पेरण्यांचा हंगाम.थंडीची चाहूल लागली की रब्बी हंगामाच्या शेतीकामाकडे शेतकऱ्यांची लगबग सर्वत्र दिसून येत असते.अशीच लगबग सध्या नेवासा तालुक्यातील प्रवरा, मुळा आणि गोदापट्ट्यात सध्या पाहायला मिळत आहे.
नेवासा तालुक्यातून गोदावरी, प्रवरा आणि मुळा नद्या असल्याने पट्ट्यातील गावे रब्बी पिकासाठी अत्यंत प्रतिकूल मानली जातात.सध्या सगळीकडे पिकाच्या पेरण्या, लागवडी सुरू आहेत.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र ऊस, कांदा या पिकांच्या लागवडीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
नेवासा तालुक्यात रब्बीचे सरासरी लागवड क्षेत्र हे ५५ हजार हेक्टर असून,सर्वाधिक क्षेत्र एकट्या कांदा पिकाने व्यापले जाते.तालुक्यात जवळपास २० हजार हेक्टरवर कांदा पीक,तर त्या खालोखाल १५ हजार हेक्टरवर गहू पीक घेतले जाते.
यंदा तालुक्यातील सर्वच पट्टयात पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारीसह अन्य अन्नधान्य पिकांकडे शेतकऱ्यांचा कल काहीसा कमी होताना दिसत आहे.
गेल्या वर्षी पाण्याअभावी कांदा पिकाची लागवड कमी होती.जी काही लागवड झाली,अशा साठवणूक केलेल्या कांद्याला यंदा अपेक्षेपेक्षा चांगला दर मिळाला. त्यामुळे या हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांद्याची रोपे टाकलेली आहेत.
सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर झालेल्या पावसाने काही ठिकाणी रोपे खराब झाली असली तरीही गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या रब्बी हंगामात कांदा लागवड क्षेत्रात मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे.
खते, औषधांच्या वाढत्या किमती, मजुरीच्या दरात झालेली वाढ आदी कारणांमुळे यंदा शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
तरीही यंदाच्या रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.मजुरीचे दर वाढणार असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्येच कांदा पिकाची पेरणी केली
कापसाचा हंगाम अजून संपलेला नाही.त्यामुळे कांदा, ऊस लागवडीसाठी शेतमजुरांची टंचाई भासत असल्याचे बघायला मिळत आहे.कांदा लागवड मजुरीच्या दरातही यंदा मोठी वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी बारा हजार रुपये असणारी कांदा लागवड यंदा प्रतिएकर तेरा ते चौदा हजार रुपयांपर्यंत गेली आहे. ऊस लागवडही एकरी साडेचार हजारांवरून पाच ते साडेपाच हजार रुपये झाली आहे.वाढत्या मजुरी दराचा यंदा शेतीला आर्थिक फटका बसणार आहे.
यंदा भंडारदरा, मुळा आणि जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने तालुक्याला पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे दिसत आहे.तालुक्यातील प्रवरा आणि मुळा नदीवरील बंधारेही पूर्ण भरलेले आहेत.
संपूर्ण तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणीपातळीदेखील वाढलेली आहे.धरणाच्या आवर्तनाचे अजून नियोजन झालेले नाही.तालुक्यात यंदा तरी पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे आशादायक चित्र आहे.