ऊसतोडणी,वीटभट्टी व इतर कामांवर मजुरीसाठी जिल्ह्यात आलेल्या हंगामी स्थलांतरीत कुटुंबाचा आणि त्यांच्या ६ ते १४ वयोगटातील शाळकरी मुला-मुलींचा नुकताच जिल्हा परिषदेतून सर्वे करण्यात आला आहे.

यात तब्बल ७४१ विद्यार्थी आपल्या आई वडिलांसोबत शाळा सोडून नगर जिल्ह्यात आल्याचे दिसले.दरम्यान,जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून संबंधित विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत प्रवेश देवून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश आल्याचे दिसले.

साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्याने हजारो ऊसतोडणी मजूर आपल्या कुटुंबासमवेत जिल्ह्यातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात दाखल झाले आहेत.त्यांच्या सोबत त्यांची शाळकरी लहान मुले आलेली आहेत.ही मुले शाळा सोडून तीन ते चार महिने आपल्या आई-वडिलांसोबत उसाच्या फडात दिसणार आहे.

मात्र यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व अतिरीक्त सीईओ संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी आपल्या यंत्रणेव्दारे शाळाबाह्य स्थलांतरीत मुलांचा सर्व्हे करण्यात आला.

विस्तार अधिकारी साठे, कार्ले यांच्या पाठपुराव्यातून वीटभट्टी,ऊसतोडणी मजुरांचे अड्डे यावर पोहचत शिक्षकांनी अशा विद्यार्थ्यांचा सर्व्हे केला.१ ते १५ डिसेंबर २०२४ या कालावधीत हा सव्हें पूर्ण झाला आहे.

जिल्ह्यात अशाप्रकारे सुमारे ४०० कुटुंबांतील ७४१ मुले-मुली शाळा सोडून ऊसतोडणी मजुरांसोबत जिल्ह्यात हंगामी स्थलांतरीत म्हणून आल्याचे दिसले.त्यांचे वय हे ६ ते १४ वयोगटातील आहे.संबंधित विद्यार्थ्यांना वयानुसार पहिली ते सातवीपर्यंत जवळच्या शाळेत प्रवेश देण्यात आला आहे.

टोळी ज्यावेळी दुसऱ्या गावात जाईल,तेथील शाळेतही या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल,याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ही मुले पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करण्यात शिक्षणाधिकाऱ्यांना यश आल्याचे दिसले.

दरम्यान,आपल्या तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात स्थलांतरीत झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही ३९ इतकी आहे.तर आपल्या तालुक्यातून इतर जिल्ह्यात कुटुंबासमवेत स्थलांतर केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३७ आढळली आहे.

राहुरी तालुक्यातील सडे येथे ‘प्रसाद शुगर’च्या कार्यक्षेत्रात ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्यात आली आहे.या ठिकाणी २१ विद्यार्थी प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

त्यांच्यासाठी जिल्हा परिषदेतून एका शिक्षकाची नियुक्ती देण्यात आली आहे.पोषण आहार दप्तर याचीही व्यवस्था शिक्षण विभाग,कारखाना व्यवस्थापन यांच्यामाध्यमातून करण्यात आल्याचे समजले.

सीईओंच्या सुचनांनुसार स्थलांतरीत विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत प्रवेश देण्यात आला आहे.त्यांना दप्तर, पोषण आहार अशा आवश्यक सुविधा दिल्या जात आहेत.जिल्ह्यात ७४१ विद्याथ्यर्थ्यांना आपण पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहेत असे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या हंगामी स्थलांतरीत विद्यार्थ्यांना दुसऱ्या जिल्ह्यात शाळेत प्रवेश घेण्यासाठी शिक्षण हमी कार्ड दिले जाते.आपल्या जिल्ह्यातून बाहेर गेलेल्या ३७ विद्यार्थ्यांना शिक्षण कार्ड वाटप केले आहे.

दुर्दैवाने नगर जिल्ह्यात स्थलांतरीत आढळलेल्या ७४१ विद्यार्थ्यांकडे त्या त्या जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे हमी कार्ड निदर्शनास आलेले नाही.असे असले तरी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,यासाठी त्यांना जवळच्या शाळेत प्रवेश मिळवून दिला आहे.