ज्या लोकांच्या धरण व कालव्यात जमिनी गेल्या त्या लोकांच्या डोळ्यात अश्रु आहेत व इतरांच्या डोळ्यात,चेहऱ्यावर हसू आहे,हा मोठा गंभीर प्रश्न आहे.त्यामुळे दोन दिवसांपासून आमचे अकोलेतील शेतकरी थंडीत कालव्यात आंदोलन करत आहे.

तो प्रश्न निकाली काढून आंदोलकांना शब्द दिला जावा,अशी मागणी आ. डॉ. किरण लहामटे यांनी नागपूरच्या हिवाळी आधिवेशनात उपस्थित करुन सरकार व विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले आहे.महाराष्ट्र सरकारचे हिवाळी आधिवेशन नागपर येथील राजभवनात सुरु आहे.

या अधिवेशनात अकोलेचे आमदार किरण लहामटे यांनी निळवंडे कालव्याचे अकोलेत सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती देताना सांगितले की,अकोले तालुक्यात निळवंडे धरण क्षेत्रातून डावा व उजवा कालवा जातो.

त्यासंदर्भात अजूनही सर्व प्रश्न मिटलेले नाहीत.शेतकऱ्यांच्या जमिनीतून बाजूला मोठमोठे खड्डे घेतलेले आहे.त्याबरोबर कालव्यातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.काही ठिकाणी पुल नाहीत किंवा पुल आहे.

त्याला स्लोप योग्य दिलेला नाही त्यामुळे अपघात होऊन ३ ते ४ जणांना प्राण गमवावा लागला आहे.गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी असतानाही आमचे शेतकरी कालव्यात आंदोलनाला बसले आहेत.

कालव्याने पाणी खालच्या भागात नेले यावर आमच्या अकोलेकरांचे काही म्हणणे नाही, परंतु जे प्रश्न मिटले पाहिजे होते, ते आत्तापर्यंतही मिटलेले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना आंदोलनाची वेळ आली आहे.

तेव्हा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसह धरण व कालव्याच्या बाबत असलेले प्रश्न तात्काळ निकाली काढून आंदोलकांना शब्द दिला जावा, अशी मागणी विधानसभा अध्यक्षाना आ. लहामटे यांनी केली.