दिवसेंदिवस महागाईमध्ये वाढ होत आहे त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींसह बळीराजा देखील या वाढत्या महागाईला त्रासून गेला आहे.सर्वात जास्त त्रास तर शेतकऱ्यांनाच भोगावा लागत आहे.

रब्बी हंगाम सुरु होत आहे त्यामुळे हा चालू रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बऱ्याच आव्हानांना तोंड दयावे लागत आहे.तसेच हा हंगाम शेतकऱ्यांना संघर्षमय ठरणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.

रब्बी हंगामात शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्रीचा वापर करणे सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खर्चिक होत आहे.ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, थ्रेशर, पंपसेट यांसारख्या यंत्रसामग्रीचे भाडे किंवा साहित्य खरेदीसाठी लागणारा खर्च प्रचंड वाढला आहे.

इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे शेती यंत्रसामग्रीचा वापर शेतकऱ्यांना परवडेनासा झाला आहे.सरकारकडून काही प्रमाणात यंत्रसामग्रीसाठी अनुदान उपलब्ध असूनही अनेक शेतकऱ्यांना या योजनांची माहिती मिळत नाही किंवा या प्रक्रियेत होणाऱ्या उशिरामुळे त्याचा लाभ त्यांना मिळत नाही. याचा थेट परिणाम रब्बी हंगामाच्या पेरणीवर होत आहे.

वाढती महागाई, खतांच्या वाढत्या किंमती, आणि शेतीमालाला मिळणारा कमी बाजारभाव यामुळे पेरणीसाठी आवश्यक संसाधनांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीमुळे शेतीसाठी महत्त्वाचा असलेला हंगाम गंभीर अडचणीत सापडला आहे.

महागाईमुळे शेतमालाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. बियाणे, इंधन, सिंचन, आणि खतांचे दर प्रचंड वाढले आहेत.सरकारने रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमती जाहीर केल्या असल्या तरी ही वाढ पुरेशी नाही,असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

फॉस्फेटिक आणि पोटेंशिक खतांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान असूनही ही उत्पादने परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.त्याचप्रमाणे खतांचा पुरवठा वेळेवर न झाल्यास पेरणीचा कालावधी लांबणीवर जाऊ शकतो,ज्याचा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.

बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे कर्ज वेळेत मिळत नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांना त्यांच्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून पैसे उभे करावे लागत आहेत. बँकांकडून कर्ज मंजुर होईपर्यंत बराच वेळ वाया जात असल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकारांवर अवलंबून राहावे लागत आहे, त्यामुळे कर्जाचे ओझे वाढत आहे.

मागच्या हंगामात शेतीमालाला कमी दर मिळाला होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पुरेसे पैसे आलेले नाहीत. यावेळी सुद्धा कापूस, सोयाबीन, डाळी अशा अनेक पिकांसाठी बाजारभाव कमी मिळाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळणे कठीण झाले आहे.

अल निनोच्या प्रभावामुळे हवामान बदलण्याची शक्यता आहे.उत्तरेकडील राज्यांमध्ये जलस्रोतांवरील अवलंबित्व अधिक आहे.सिंचनासाठी लागणारे पाणी मर्यादित असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने खतांचा पुरवठा वेळेवर आणि परवडणाऱ्या किंमतीत करायला पाहिजे,बँकांकडून लवकर कर्ज मिळण्यासाठी प्रक्रियेला गती देऊन कर्ज सहज मिळवून द्यावे,एमएसपी मध्ये सुधारणा करून शेतीमालाला किफायतशीर बाजारभाव मिळवून द्यायला पाहिजे,हवामानावर आधारित सल्लागार सेवा आणि जलसंधारण प्रकल्प राबवायाला पाहिजे.

रब्बी हंगामात शेतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने धोरणात्मक उपाय तातडीने राबवणे आवश्यक आहे.नाहीतर शेतकऱ्यांच्या समोर असलेल्या आर्थिक संकटामुळे रब्बी हंगामाची उत्पादकत्ता मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे,ज्याचा परिणाम शेती क्षेत्रावर आणि देशाच्या अन्नसुरक्षेवर होऊ शकतो.