८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांगांना मतदानाचा अधिकार मिळावा व त्यांनाही मतदान करता यावे, यासाठी तीन दिवस जिल्ह्यातील १२ मतदारसंघांत पात्र मतदार गृह मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील नागरिक, तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय केली आहे.
जिल्ह्यात ही प्रक्रिया ८ ते १० नोव्हेंबर रोजी राबविली जाणार आहे.या सोयीचा जिल्ह्यातील अडीच हजार मतदारांना लाभ होणार आहे.
जिल्ह्यात १९ हजार ९६० दिव्यांग व ८५ वर्षांवरील ५५ हजार ८०१ एवढे मतदार आहेत. यापैकी गृह मतदान सुविधेसाठी २ हजार ६८८ मतदारांनी इच्छा प्रदर्शित केली आहे.
यामध्ये २२७१ ज्येष्ठ, ३५४ दिव्यांग, तर ६३ अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी आहेत. जिल्ह्यातील १२ मतदारसंघांत विधानसभा निवडणुकीसाठी १५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
तर ३७ लाख ८३ हजार ९८७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यातील १ हजार ९९४ ठिकाणी ३ हजार ७६३ मतदान केंद्र आणि दोन सहायक मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.
जाणून घ्या गृह मतदानाची प्रक्रिया
गृह मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मतदानाची व्हिडीओग्राफी करण्यात येणार असून, दोन अधिकारी किंवा कर्मचारी, मायक्रो निरीक्षक, व्हिडीओग्राफर, उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी सोबत राहणार आहेत.
गृह मतदानाची पूर्वसूचना बीएलओमार्फत संबंधित नोंदणीकृत मतदारांना देण्यात येत आहे.कोणत्याही प्रकारे मतदारांच्या मतदान गोपनीयेतचा भंग होणार नाही, याची काळजी घेतली जाते
मतदारांना आवश्यक माहिती वेळेवर मिळावी, यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने मोफत हेल्पलाइन क्रमांक १९५० दिला आहे.
देशभरातील लोक या नंबरवर कॉल करु शकतात आणि ते प्रतिनिधीशी जोडले जातील.या नंबरवर कॉल करणाऱ्याना प्रतिनिधी आवश्यक माहितीसाठी मदत करतील.
फॉर्म १२-डी अर्ज पोस्टल बॅलेट पर्यायासाठी निवडणूक घोषणेच्या तारखेपासून आणि निवडणुकीच्या अधिसूचनेच्या पाच दिवसांनंतर आरओकडून मिळणे गरजेचे आहे.फॉर्म १२-डी संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करणे गरजेचे आहे.