संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील जांबुत बुः येथील वैतागवाडी या ठिकाणी देवराम आप्पाजी मेंगाळ हे सहकुटुंब राहतात.मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.
देवराम मेंगाळ यांच्या घराला अचानक आग लागल्याची घटना काल मंगळवारी दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडली.या आगीत मेंगाळ यांच्या संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.तर छपरातील झोळीत झोपलेल्या लहान बाळाला वेळेत वाचवल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
आग लागली तेव्हा छपरातील झोळीत छोटं बाळ झोपलेले होते.संतोष शेटे यांनी जीवाची पर्वा न करता छपरात जावून बाळाला बाहेर काढले.यामुळे बाळाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे
या बाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी कि,मंगळवारी (दि.२६) दुपारी कामानिमित्त देवराम मेंगाळ हे बाहेर गेले होते. घरी एक महिला व छोटं बाळ होतं. दरम्यान दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक छपराच्या घराला आग लागली.
काही क्षणातच संपूर्ण छप्पराने पेट घेतला.नागरिकांना आग लागल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.या आगीत संपूर्ण घरातील संसारच जळून खाक झाला.
भयंकर पेटलेलया या आगीमुळे देवराम मेंगाळ यांची झोपडी आणि संसारपयोगी साहीत्य जळून खाक झाल्यामुळे मेंगाळ कुटुंबावर मोठं संकट कोसळल असून त्यांच्या बाळाचे प्राण बचावले असल्याने त्यांच्या जीवात जीव आला.शासनाने या कुटुंबाला आर्थिक आणि आवश्यक ती मदत करावी,अशी मागणी सरपंच,पोलिस पाटील आणि ग्रामस्थांनी केली आहे.