शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी व परिसरातील गावांमध्ये कांदा लागवड वेगात सुरू आहे.मात्र,लागवडीसाठी वीज, पाणी, कांदा रोप व महिला मजूर या सर्वांची सांगड घालताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे.
सध्या लागवडीसाठी महिलांना ६०० ते ७०० रुपये मजुरी द्यावी लागत आहे.एकरी कांदा लागवडीसाठी कमीत कमी १८ ते २० मजुरांची गरज लागते,त्यामुळे यावर्षी उत्पादनाचा खर्च वाढणार आहे.पहिल्या टप्प्यात परतीच्या पावसामुळे काही भागातील कांदा रोपे वाया गेली आहेत.
मात्र, दुसऱ्या टप्प्यात असलेली मागास कांदा रोपे उपलब्ध होणार आहेत.शेवगाव तालुक्यातील एकूण कांदा लागवड क्षेत्रापैकी ७० टक्के कांदा लागवड दहिगावने व भातकुडगाव कृषी मंडळ विभागात समाविष्ट होणाऱ्या ४० गावांमध्ये होते.
त्यात प्रामुख्याने शहरटाकळी, भावीनिमगाव, दहिगावने, देवटाकळी, मठाचीवाडी, रांजणी, घेवरी, मजलेशहर, बक्तरपूर, भायगाव, ढोरसडे-अंत्रे, भातकुडगाव, हिंगणगावने या गावांमध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होते.
परतीच्या पावसामुळे काही भागात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात टाकलली कांदा रोपे सडल्याने लागवडीसाठी रोपाचा रोपाचा तुटवडा निर्माण झाला होता.सध्या कांदा रोपाला चांगला भाव आहे.
मात्र, कित्येक शेतकऱ्यांनी पुन्हा कांदा रोपे टाकल्याने आता कांदा रोप मोठे प्रमाणात उपलब्ध असल्याचे दिसत आहे.यंदा कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांना तारेवरील कसरतच करावी लागत आहे.
महिला मजूर, पाणी, कांदा रोपे, वीज या सर्वांची एकत्र सांगड घालून कांदा लागवड करताना शेतकऱ्यांची दमछाक झाल्याचे दिसून येते.त्यातच वाढती मजुरी बदलते हवामान, खते व औषधांच्या वाढत्या किमती, विजेचा लपंडाव, यामुळे कांद्याच्या उत्पादन खर्चात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे
मजुरांची टंचाई असल्याने वाहन पाठवून शेजारच्या गावातून महिला मजूर कांदा लागवडीसाठी आणावे लागत आहेत. वाहनासाठी दररोज अंतरानुसार ५०० ते १००० रुपये भाडे द्यावे लागते.शेतकऱ्यांना मजुरांच्या तुटवड्यामुळे मजुरीवर जास्त खर्च करावा लागतो.