पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरलेल्या वांबोरी चारीचे पाणी तिसरी मोटार नादुरुस्त असल्याच्या कारणामुळे बंद केले.दोन महिने वांबोरी चारीला पाणी येऊनही मिरी भागातील तलावात पाणी आले नाही.वांबोरी चारीला पाणी सोडून मिरी परिसरातील तलावात अगोदर पाणी सोडले,तर या भागातील पिकांना जीवदान मिळेल.

पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे.या भागातील काही पाझर तलाव पावसाच्या पाण्याने भरले तर काही अर्धे झाले आहेत.यावर्षी वांबोरी चारीला ओव्हरफ्लोचे पाणी दोन महिने सोडण्यात आले.मात्र,मिरी भागातील तलावात हे पाणी पोहोचलेच नाही. मिरी परिसरात पावसाचे प्रमाण यावर्षी कमी असल्याने या भागाला आज पाण्याची गरज आहे.

मिरी परिसरातील शंकरवाडी तलावात तीन वर्षांपासून वांबोरी चारीचे पाणीच आलेले नाही. वांबोरी चारीला पाणी सोडून मिरी परिसरातील तलावात पाणी सोडल्यास येथील पिकांना जीवदान मिळेल. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची गरज पडणार नसून शासनाचा टँकरवरील खर्चही वाचेल.

वांबोरी चारीला पाणी सोडून अगोदर मिरी लाईन सुरू करावी, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजूमामा तागड, संभाजी पालवे, महेंद्र सोलाट, अशोकराव दहातोंडे, बाळासाहेब अकोलकर, जगदीश सोलाट, मयूरतात्या तागड, विजय जाधव, जगन्नाथ जाधव, संभाजी तोगे, संदीप खरपुडे, सारंगधर सोलाट, शंकरवाडी व मिरी ग्रामस्थांनी केली आहे.

मिरी भागात यावर्षी पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते.त्यामुळे वांबोरी चारीला पाणी सोडून अगोदर मिरी लाईनला पाणी दिले,तर या भागातील पिकांना जीवदान मिळेल.उन्हाळ्यात या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही.कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्याकडे तशी मागणी केली आहे.असे संभाजी पालवे (माजी सभापती,पंचायत समिती) यांनी सांगितले आहे.