खरिपानंतर आता उन्हाळ कांद्याच्या लागवडी सुरू आहेत.त्यातच दिवसेंदिवस वाढत चाललेली मजूर टंचाई, वाढता खर्च शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे नेवासा तालुक्यात कांदा लागवडीसाठी हायटेक तंत्रज्ञानाचा (कांदा टोकन यंत्र) वापर शेतकरी करू लागले आहेत.
यातून वेळ,पैशांची बचत होत आहे.योग्य अंतरावर रोप लागवड होत असल्याने उत्पादनातही वाढ होणार आहे.नेवासा तालुक्यातील प्रवरा, मुळा, गोदावरी पट्टयात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते.
मुळा, भंडारदरा धरणाचे कालवे, नद्यांवरील बंधाऱ्यांची मालिका, जायकवाडी धरणाचे बॅकवॉटर यामुळे नेवासा तालुका बारमाही बागायती म्हणून ओळखला जातो.तालुक्यात दरवर्षी साधारण वीस हजार हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड केली जाते.
खरीप आणि रब्बी हंगामात जवळपास एक लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन घेतले जाते.तालुक्यातील भेंडा, कुकाणा, नेवासा, देडगाव, प्रवरासंगम, बेलपिंपळगाव, पाचेगाव, सोनई, घोडेगाव, वडाळा, सलाबतपूर परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते.
यंदा कांद्याची लागवड करताना शेतकरी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.शेतकऱ्यांना कांदा लागवडीसाठी मजूर टंचाईला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे शेतकरी पारंपरिक लागवडीला फाटा देऊन आता मल्चिंग पेपर बेड, सारे पट्टे, पेरणी यंत्र, रोप टोकन यंत्राद्वारे कांदा लागवड करत आहेत.
यंदा कांदा लागवडीसाठी टोकन यंत्राचा वापर होत आहे.सध्या तालुक्यात चार शेतकऱ्यांनी टोकन यंत्राची खरेदी केली आहे. चार सीटर, पाच सीटर, सहा सीटर, आठ सीटर अशा प्रकारचे कांदा रोप टोकन यंत्र उपलब्ध आहेत.
साधारण एका कांदा रोप टोकन यंत्राद्वारे दिवसभरात एक एकरपर्यंत लागवड होते. तीन लाखांपासून साडेपाच लाखांपर्यंत टोकन यंत्राची किंमत आहे.पारंपरिक लागवडीत साधारण दीड लाख कांदा रोपे लागवड केली जाते.या टोकन यंत्राद्वारे पावणेतीन लाख रोपांची लागवड होते.
सरासरी उत्पादन वीस ते पंचवीस टन होते.रोपातील अंतर चहूबाजूने सारखे असल्याने कांदा गुळगुळीत तयार होतो.रोपे सव्वा ते दीड इंचापर्यंत खोल आणि उभी रोवली जातात.लागवडीसाठी कमी मजुरांची गरज भासते.पुरुष, लहान मुलेही लागवड करू शकतात.
कांदा रोप लागवडीसाठी विकसित केलेल्या टोकन यंत्राची किंमत लाखात आहे.चार सीटर टोकन यंत्र- साडेचार फुट बेड निर्मिती, अंदाजे किमत – २ लाख ७५ हजार रुपये, पाच सीटर टोकन यंत्र- सहा फूट बेड निर्मिती, अंदाजे किंमत ३ लाख ७० हजार रुपये, सहा सीटर टोकन यंत्र- सात फुट बेड निर्मिती, अंदाजे किंमत – ४ लाख २५ हजार रुपये, आठ सीटर टोकन यंत्र- साडेचार फुटाचे दोन बेड निर्मिती, किंमत अंदाजे ५ लाख रुपये.
हे टोकन यंत्र खरेदी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.त्यामुळे सरकारने या टोकन यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान द्यावे,अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत
मुजूर टंचाई असल्याने ट्रॅक्टरच्या साह्याने रोप टोकन यंत्राद्वारे लागवडीची मागणी वाढत आहे.या यंत्राद्वारे लागवड करताना वेळेची आणि पैशाचीही बचत होते. त्यासाठी एकरी साधारण तेरा ते चौदा हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.सरे, दंड पाडणे, रान बांधणी हा खर्च वाचतो.ट्रॅक्टरला एकरी दहा ते बारा लिटर डिझेल लागते.