नगर तालुक्यात ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगामातील सर्वच पिकांवर विविध रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे.कीटकनाशक,बुरशीनाशक औषध फवारणीबरोबरच काही ठिकाणी देशी जुगाड करून शेतकरी पिके वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

काढणीला आलेल्या लाल कांदा उत्पादकांचा अवकाळी पावसामुळे जीव टांगणीला लागला आहे.सुमारे पन्नास हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिके डोलावत होती.पोषक वातावरणामुळे सर्व पिके ही जोमात होती.परंतु गेल्या चार दिवसापासून वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे रब्बी हंगामातील सर्वच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

रब्बी गहू, ज्वारी, हरभरा, गावरान कांदा, लसूण या पिकांना विविध रोगांनी ग्रासले आहे.या वातावरणातील बदलाचा फटका उत्पन्नावर होणार आहे.पिके जोमात येण्यासाठी गुलाबी थंडी बरोबरच प्रखर सूर्यप्रकाशाची गरज आहे.

सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे सर्वच पिके रोगांना बळी पडले आहेत.गहू, हरभरा, ज्वारी, गावरान कांदा, लसूण, चारा पिके, मका, तसेच भाजीपाल्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे.काढणीला आलेल्या लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.

अवकाळी पावसाने तालुक्यात काही भागात तुरळक प्रमाणात हजेरी लावली असली तरी हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविल्याने लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले पाहावयास मिळते.तालुक्यातील बहुतांशी भागात लाल कांदा काढणीला आलेला आहे.

सुमारे दोन एकर कांद्याची लागवड झालेली आहे.वातावरणातील बदलाचा परिणाम कांद्यावर झाला असून,कांदा पिकांवर डाऊनी, तुडतुडे, मावा, मर, करपा अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव पडत असल्याचे दिसत आहे.त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणितच कोलमडून जाणार आहे.

सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यांतील ढगाळ हवामान, धुके यामुळे लाल कांदा विविध रोगांनी ग्रासला गेला होता.त्यामुळे लाल कांद्याच्या उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे.अवकाळी पावसाने हजेरी लावली,तर काढणीला आलेल्या कांद्याच्या गाभ्यांमध्ये पाणी जाऊन कांदा सडण्याची शक्यता असते.त्यामुळे लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर अवकाळीचे संकट उभे ठाकले आहे.

रब्बी पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून बुरशीनाशक, कीटकनाशक फवारणी करण्यात येत आहे.त्यासाठी एकरी ४० हजार रुपये खर्च झाला.काही ठिकाणी काढणीला आलेल्या कांद्याच्या गाभ्यात पाणी जाऊ नये,म्हणून लोखंडी टिपाडाच्या सहाह्याने कांद्याची पात झोपविण्यात येत आहे.

आधीच लाल कांदा उत्पादनासाठी पोषक वातावरण नव्हते त्यामुळे उत्पन्नात घट होणार आहे.त्यातच अवकाळीचे संकट उभे राहिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.सकाळी पडलेले दव हटविण्यासाठी दोरी अथवा लिंबाच्या डहाळीचा प्रयोग करण्यात येत आहे.

रब्बी पिके घेण्यासाठी शेतीची मशागत, खुरपणी, बियाणे, खते, लागवड यावर मोठा शेतकऱ्यांनी खर्च केला आहे.सर्वच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड चालू आहे.