आठवडाभरापासून वातावरणातील बदलामुळे कोपरगावात दोनदा अवकाळी पावसाने हजेरी लावली.तालुक्यात अनेक ठिकाणी गुरूवारी मध्यरात्री साडेबारा ते शुक्रवारी पहाटेपर्यंत आकाशात सुरू असलेल्या विजांचा तांडव, धीरगंभीर आवाज यामुळे कोपरगावकर भयभीत झाले.

या अवकाळी पावसामुळे कांदा लागवडीसाठी तयार केलेली रोपे, रब्बी हंगामातील गहु, हरभरा यासह बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यात चितळीमध्ये सर्वाधिक २ इंच (५५ मिली मीटर) पाउस पडल्याची नोंद झाली आहे.

दरम्यान, १३२ केव्ही वीज स्टेशनवर ब्रेकर नादुरुस्त झाल्याने सुमारे दहा तास वीज पुरवठा खंडित झाला होता.वादळी पावसामुळे मध्यरात्रीपासून वीज गायब होती.या पावसामुळे उसतोडणी कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले,तसेच त्यांना तोडणी बंद ठेवण्याची वेळ आली.

पावसामुळे शेतात जाणाऱ्या रस्त्याची वाट लागली होती.अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले होते.दोन दिवसापासून थंडी गायब झाली असून पावसानंतर पुन्हा वातावरणात गारवा वाढला आहे.यामुळे अबाल वृध्दांना सर्दी, पडसे, तापाच्या रूग्णांत वाढ होतांना दिसत आहे.

अचानक झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागात मजूरांना रोजगाराची शोधाशोध करण्याची वेळ आली.ऐन थंडीत झालेल्या पावसामुळे सर्वांची त्रेधातिरपीट उडाली.ज्या शेतकऱ्यांनी कांदा लागवडीचे काम हाती घेतले,त्यांची पावसामुळे अडचण झाली असून तर ज्यांनी कांदा पिकाचे रोपे टाकले त्याचे नुकसान होणार आहे.

लागवड झालेल्या कांद्यावर करपा रोगाचा प्रार्दुभाव पहावयास मिळत आहे.या पावसामुळे गहू पिकासह बागायती पिकांचे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ज्या शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडी केल्या, त्यांच्यासाठी अवकाळी पाऊस दिलासा ठरणार आहे.

शेतात उभ्या असलेल्या कापूस पिकाच्या बाती झाल्या आहे.शहरासह तालुक्यात सर्वदुर पाउस पडला.त्यात शेतातील खळयावर असंख्य शेतकऱ्यांनी झाकुन ठेवलेली मका, सोयाबीन, लाल कांदा आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने तालुक्यातील अनेकजणांचे टीव्ही, फ्रिज, इन्व्हर्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, इलेक्ट्रिक आदी यंत्रसामग्री जळाली तर काहींची बंद पडल्या आहेत.त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला असून विजा पडल्याचा सात-आठ वेळेस जोरदार आवाज झाल्याने अनेकजण भयभीत झाले होते.

दरम्यान, वीज पडून अथवा अन्य कारणामुळे कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याने तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आले.मात्र, तालुक्यात शेतीसह अन्य झालेले नुकसानाची कोणतीही माहिती महसूल विभागाकडे उपलब्ध झाली नव्हती.