नगर तालुक्यात वनविभागाने बौद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात केलेल्या वन्य प्राण्यांच्या गणनेत सर्वाधिक रानडुकरांची संख्या आढळून आली.रानडुकरांचा उपद्रव शेतकऱ्यांसाठी खूपच डोकेदुखी ठरत आहे.ते पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

पिकांच्या बचावासाठी शेतकऱ्यांनी देशी जुगाड करीत विविध प्रयोग शेतामध्ये राबविले आहेत.त्यात काही प्रयोग चांगलेच यशस्वी ठरल्याचे दिसते.तालुक्यातील शेतकऱ्यांना नेहमीच वातावरणाच्या लहरीपणाचा फटका बसतो.त्यातच पिकांची मोठी नासाडी रानडुकरांकडून होत असते.

त्यांच्यापासून सर्वच पिकांना धोका आहे. तालुक्यात गर्भगिरीच्या मोठ्या रांगा विखुरलेल्या असल्याने या डोंगररांगांनी विविध वन्य प्राण्यांबरोबर रानडुकरांची संख्या मोठी आढळते.गेल्या काही वर्षांमध्ये रानडुकरांची संख्या लक्षणीय वाढली आहे.

बौद्ध पौर्णिमेला सर्वाधिक लख्ख चंद्र प्रकाश पडत असल्याने या दिवशी जंगलामध्ये वन्य प्राण्यांची गणना वनविभागाच्या वतीने करण्यात येत असते.चालू वर्षी करण्यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या गणनेमध्ये तालुक्यात सर्वाधिक रानडुकरांची संख्या आढळली आहे.

रानडुकरांची वाढती संख्या ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.रानडुकरांकडून मका, फळबाग, ज्वारी, कडवळा बरोबरच विविध पिकांचे मोठे नुकसान करण्यात येते. तसेच फळबागा व पिकांसाठी लावलेल्या ठिबक सिंचनच्या पाईपचेही नुकसान केले जाते.

रानडुकरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून शेतकरी चिंतेत आहेत.शेतकरी पिकांच्या संरक्षणासाठी विविध क्लुप्त्या आजमावत आहे.काही ठिकाणी बांधांवर सलुनमधील केस जाळून त्याचा धूर करण्यात येतो,तर काही ठिकाणी मिरचीची पावडर टाकून धूर करण्यात येतो.

काही शेतकऱ्यांनी पिकाच्या शेताला कंपाउंड करून घेतले आहे. जेऊर परिसरातील शेतकरी शेताच्या चोहोबाजूंनी बांबू उभा करीत त्यावर कांद्याच्या रंगीत मोकळ्या गोण्या टाकून माणूसच उभा असल्याचा भासवण्याचा प्रयत्न करीत आहेत.हा प्रयोग चांगल्यापैकी यशस्वी झाल्याचे चित्र पाहावयास मिळते.

तालुक्यात रानडुकरांची वाढती संख्या ही शेतकऱ्यांसाठी खूपच डोकेदुखी ठरत आहे.जेऊर ग्रामसभेत, तर रानडुकरांचा बंदोबस्ताचा ठराव घेण्यात आला होता. यावरून रानडुकरांच्या उपद्रवाची कल्पना येते.

बिबट्यांचा वावर असलेल्या परिसरात मात्र रानडुकरांच्या संख्येमध्ये घट झाल्याचे पहावयास मिळत आहे.पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या देशी जुगाडाची चांगलीच चर्चा तालुक्यात झडत आहे.

रानडुकरांकडून ज्वारीच्या पिकांची मोठी नुकसान करण्यात येत आहे.तसेच मक्याचीही खूप नासाडी करण्यात येत आहे. उन्हाळ्यात ठिबक सिंचनच्या पाईपचे नुकसान करण्यात येते,तर फळबागांचेही नुकसान केले जाते.

जेऊर परिसरात ससेवाडी तसेच डोंगरगण रस्ता येथे रानडुकरांकडून मानवावर हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत. रानडुकरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे,असे जेऊरच्या सरपंच ज्योती तोडमल यांनी सांगितले

वन्यप्राण्याच्या गणनेत रानडुकरांची संख्या सर्वाधिक आढळली.त्यांच्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या बांधावर पोत्यावर मिरचीची पावडर टाकून त्याचा धूर केल्यास रानडुकरे जवळ भटकत नाहीत.हा प्रयोग अनेक ठिकाणी यशस्वी झाल्याचे पाहावयास मिळते.

शेतात झेंडूच्या फुलांची लागवड करण्यात आली.सुरुवातीला रानडुकरे ठिबक सिंचन पाईप व झाडांची मोठे नुकसान करीत असताना चोहोबाजूंनी बांबू उभे करून त्यावर कांद्याच्या लाल रंगाच्या मोकळ्या गोण्या टाकल्याने रानडुकरांना तेथे माणूस असल्याचा भास होतो.त्यामुळे रानडुकरांचा उपद्रव कमी झाला आहे. हा प्रयोग शेतकऱ्यांनी करून पाहावा याचा निश्चितच फायदा होतो.