चालू वर्षीच्या रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेत १५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ४६ हजार ५२५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून रब्बी हंगामातील पिकांचा विमा उतरविला आहे.या शेतकऱ्यांचे ५ लाख ५४ हजार विमा अर्ज प्राप्त झाले आहेत.

या योजनेत शेतकऱ्यांनी हंगामातील ३ लाख २ हजार ११० हेक्टरवरील पिकला संरक्षण घेतले आहे.दरम्यान, यंदाच्या पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत दोन दिवसांपूर्वीच संपली असून आता बँकांमध्ये ऑफलाईन पद्धतीने आलेल्या अर्जाची माहिती येत्या १५ दिवसांत विमा कंपनी आणि राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.

त्यानंतर रब्बी पीक विमा योजनेत एकूण सहभागी शेतकरी त्यांचे अर्ज आणि विमा सरंक्षण घेतलेल्या क्षेत्राचा आकडा अंतिम होणार असल्याचे सांगण्यात आले.शेतकऱ्यांसाठी दोन वर्षापूर्वी राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यासाठी एका रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे.

नगर जिल्ह्यात रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, उन्हाळी कांदा, भुईमूग या प्रमुख पिकांचा विमा शेतकऱ्यांकडून उतरविण्यात आला आहे.चालू हंगामात २ लाख ४६ हजार ५२५ शेतकऱ्यांनी विमा उतरविण्यासाठी ५ लाख ५४ हजार अर्ज दाखल केलेले आहेत.

यामध्ये ८ हजार १९ कर्जदार तर ५ लाख ४६ हजार ७८ बिगर कर्जदार अर्जाचा समावेश आहे. या शेतकऱ्यांनी ३ लाख २ हजार ११० हेक्टरवरील पिकांना विमा संरक्षणाचे कवच घेतलेले आहे.

जिल्ह्यात कांदा पिकासह फळबाग योजनेत काही शेतकऱ्यांनी क्षेत्र कमी असताना अथवा पीक नसताना विमा उतरवलेला आहे.याबाबत चौकशी आणि तपासणी झाल्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा बोगस विमा रद्द करण्यात आलेला आहे.

फळबाग वगळून उर्वरित पिकांच्या विम्यापोटी शेतकऱ्यांनी एक रुपयाप्रमाणे शुल्क भरले आहे.फळबाग योजनेत पीक निहाय वेगवेगळे हप्ते असून त्यातील शेतकरी हप्ता जप्त करण्यात आलेला आहे.बोगस पीक विमा काढण्यावर पुढील कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.