अत्यंत वाईट अवस्थेत असलेल्या व अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आहिल्यानगर मनमाड रस्त्याची दखल आपण घेतली असून त्यासाठी आगामी आठ दिवसांत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यावर मार्ग काढू आणि त्यासाठी २ हजार ५०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली जाईल,अशी माहिती केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रश्नास उत्तर देताना संसदेत दिली आहे.
आहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामाच्या दोन वेळा निविदा काढल्या होत्या.बी.ओ. टी. तत्वावर हे काम होणार होते. मात्र त्या कमी दराने भरल्या गेल्या.त्यानंतर दोन ठेकेदारांनी काम अर्धवट सोडले.एका बँकेने खोटी बँक हमी दिल्यामुळे अनेक अपघात होऊन निष्पापांचे बळी गेले आहेत.
त्यामुळे त्या दोन्ही ठेकेदारांवर कारवाई सुरू केल्या असल्याच्या बामत्या होत्या.या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून येत्या पंधरा दिवसांत या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम केले जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या होत्या. जिल्हाधिकारी यांचेकडे जबाबदारी सोपवली गेली होती.
पंधरा दिवसांत आढावा घेतला जाणार असल्याचा बातम्या पसरवल्या गेल्या होत्या.मात्र या पैकी काहीच झाले असल्याचा पुरावा ना प्रवाशांना मिळाला ना अवजड वाहन धारकांना की प्रवाशांना त्यामुळे या रस्त्यावरील अपघात वाढत जाताना प्रवाशांचे हकनाक बळी जाताना दिसत होते.
त्यामुळे याबाबत नुकताच हिवाळी अधिवेशनात शिर्डीचे उबाठा शिवसेनेचे खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री यांना याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता.त्यावेळी नितीन गडकरी यांनी त्यास उत्तर देताना ही माहिती दिली आहे.
गडकरी म्हणाले,आता आम्ही या रस्त्याचा प्रश्न गांभीर्यानं घेतला असून या मार्गावर साईभक्तांची ये-जा असते आणि तो रस्ता खराब असल्याने आम्हाला त्यांचा मोठा संकोच वाटत असून त्यासाठी आम्ही आता एक अल्पकालावधी निविदा जारी केली असून त्यासाठी २ हजार ५०० कोटींची निविदा बोलावली आहे.
त्यातून सदर काम निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन दोन महिन्यांत सुरू होईल असा विश्वास खा. वाकचौरे यांना दिला आहे. यापूर्वी या रस्त्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले त्यातील तीन ठेकेदार पळून गेले आहे.निविदा काढल्या की त्यातील अनेक ठेकेदार ती प्रक्रिया लवचिक असल्याने जवळपास ३०- ५० टक्के न्यूनतम पातळीवर भरतात.
मात्र ते काम पूर्णत्वास नेत नाही आणि मध्येच पळून जात आहे हे खरे आहे.आम्ही नवीन ठेकेदारांना संधी मिळावी व त्यांच्यातून नवीन चांगले ठेकेदार जन्मास यावे अशी रास्त अपेक्षा केली असताना त्यांचे परिणाम दुर्दैवाने वाईट हाती आले असून त्यातून फायदा होण्याऐवजी तोटा झाला आहे.
त्यात आता आम्ही सुधारणा करत आहोत.आता दोन ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत.मात्र त्यातच पुन्हा तीच स्थिती उद्भवली असून त्यावर आपण पुन्हा अधिकाऱ्यांना योग्य सूचना केल्या आहेत.
तो पर्यंत रस्त्याची डागडुजी करण्यासाठी आपण मलमपट्टी करण्याचे आदेश दिले आहे.त्यानंतर सदर रस्ता खा. वाकचौरे यांच्या सूचनेप्रमाणे काँक्रीटीकरण करून केला जाईल असा विश्वास दिला आहे.दरम्यान या मागणीचे उत्तर नगर जिल्ह्यात प्रवाशी आणि नागरिकांनी स्वागत केले आहे.