जवळपास ११० वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या गोदावरी कालव्यांची वहन क्षमता कमी होऊन सिंचनावर होणारा परिणाम दूर करण्यासाठी निवडणुकीपूर्वी गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचे दिलेले आश्वासन पूर्ण करताना ३०० कोटीच्या निधीला मंजुरी मिळविली होती. त्या निधीतून आजवर ७२ कोटींची कामे पूर्ण झाली. पुढील कामांसाठी १९५ कोटीच्या कालवे दुरुस्तीच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी पत्रकात दिली आहे.
आवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव तालुक्यासाठी नाशिक जिल्ह्यात ब्रिटिशांनी दारणा धरण बांधले. शेतीसाठी शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यांची निर्मिती केली. त्यावेळी उजवा कालवा ६७७ क्युसेक्स व डावा कालवा ३७९ क्युसेक्स वेगाने वाहत होते. या कालव्यांनी शंभरी केव्हाच पार केली असून कालवे जीर्ण झाल्यामुळे कालव्यांची वहन क्षमता कमी होवून ६७७ क्युसेक्सने वाहणारा उजवा कालवा क्युसेक्स ५०० व ३७९ क्युसेक्सने वाहणाऱ्या डावा कालवा १५० क्युसेक्स पाणी वाहून नेण्यास असमर्थ ठरत होता.
त्यामुळे अनेकवेळा हे कालवे ठिकठिकाणी फुटून लाखो लिटर पाणी वाया जावून त्याचा परिणाम गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेती सिंचनावर होत होता. त्याचबरोबर गोदावरी कालव्याच्या पाण्याच्या भरवशावर दोन सहकारी साखर कारखाने, छोटे-मोठे उद्योग, अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना व निफाड, कोपरगाव, शिर्डी, राहाता या मोठ्या शहरांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन अवलंबून असल्यामुळे त्यावर देखील विपरीत परिणाम होत असल्यामुळे गोदावरी कालव्यांची दुरुस्ती हा मतदार संघाचा ऐरणीचा विषय झाला होता.
गोदावरी डाव्या उजव्या कालव्यावर हजारो हेक्टर शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असल्यामुळे निवडणुकीपूर्वी मतदारसंघातील जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी गोदावरीच्या डाव्या उजव्या कालव्यांना निधी मिळावा, यासाठी आ. काळे यांनी दुरुस्तीचा आराखडा तयार करून जलसंपदा मंत्र्यांची वेळोवेळी भेट घेवून त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते.
त्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडेदेखील कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्याबाबत आग्रही मागणी केल्यामुळे गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ३०० कोटीची तरतूद करून दरवर्षी १०० कोटीचा निधी देण्याचे नियोजन करण्यात आले आले होते. त्या नियोजनानुसार आजपर्यंत गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ७२ कोटी निधी उपलब्ध झाला असून या निधीतून बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत.
पुढील कामांसाठीदेखील ठरल्याप्रमाणे निधी मिळावा याबाबत आ. काळे यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन पाटबंधारे विभागाने १९५ कोटीच्या कालवे दुरुस्तीच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या निधीतून २६७ कोटी निधी अस्तरीकरण माती काम व जीर्ण झालेली जुनी बांधकामे नव्याने करण्यात येणार आहे.
त्यामुळे आवर्तन सुरु असतांना सिंचनासाठी येणाऱ्या अडचणी दूर होवून कालव्यांची वहन क्षमता वाढली जावून पूर्ण क्षमतेने सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून आ. काळे यांनी गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीची वचनपूर्ती यानिमित्ताने पूर्ण केली आहे.