महाराष्ट्रात काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकांचे वातावरण होते ते वातावरण आता शांत झाले असून.निवडणुकीनंतर ऊसतोडणीच्या कामाला सुरूवात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
प्रत्येक वर्षी दसरा झाल्यानंतर गळीत हंगामाला सुरुवात होत असते.राज्यातील साखर आयुक्तालयाने राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू करायला परवानगी दिल्यामुळे महाराष्ट्रातल्या विविध कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केले आहेत.
नेवासा तालुक्यात ऊसतोडणीला सुरुवात झाली असून परिसरात ऊसतोडणी मजुर त्यांच्या कुटुंबासह दाखल झाल्या असून रिकामी जागा पाहून मजुरांनी आपला संसार थाटला आहे.
तालुक्यातील सगळ्या साखर कारखान्याजवळ ऊसतोडणी मजुरांच्या झोपड्या दिसायला सुरुवात झाली आहे.गावामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात सुद्धा विविध कारखान्यांचे ऊसतोड कामगार दाखल झाले असून,ऊसतोडणीचे कामही चालू झाले आहेत.
पहिल्याच दिवशी पहिला फड,पहिले वाहन आणि पहिला दिवस असल्यामुळे मजुरांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला होता;तर दुसरीकडे संसार उघड्यावर ठेवलेला पहायला मिळत होता.
ज्याप्रमाणे बाहेरच्या भागातून उसतोड कामगार तालुक्यात येतात त्याचप्रमाणे तालुक्यातील ऊसतोड कामगार सुद्धा बाहेरच्या जिल्ह्यात विविध कारखान्यांवर ऊसतोडणीसाठी हजारो मजूर जातात.
महाराष्ट्रात दरवर्षी ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होत असतो पण यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमुळे हा हंगाम २० नोव्हेंबर नंतर सुरू करावा असा आग्रह राजकारण्यांनी धरल्यामुळे कोणत्याही कारखान्यांना तात्पुरता गाळपाचा परवाना देऊ नका,अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती.
परंतु साखर आयुक्तालयाने गुरुवार पासून साखर कारखान्यांना गाळप सुरु करण्याची परवानगी दिलयामुळे विविध कामगारांच्या टोळ्या आपापल्या विभागात ऊसतोडणीसाठी हजर झाल्याचे पहायला मिळत आहेत.
ऊसतोड कामगार आपल्या कामाला लागले असून पहिल्या दिवशी ऊसतोडीची तयारी सुरू झाली आहे.लोकनेते मारुतरावजी घुले पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणीला रविवार पासून सुरुवात झाली असून सोबतच इतर कारखान्यांचेही गाळप सुरू झाले असल्याचे बघायला मिळत आहेत.
पहिल्याच दिवशी विविध ठिकाणांहून आलेल्या ऊसतोड मजुरांनी अड्डे, आखाडे, माळरान, गावाजवळील रिकाम्या जागेवर आपल्या झोपड्या तयार करून संसार थाटला आहे,तर काही मजूर निवाऱ्यासाठी कोप्या करीत आहेत.ऊसतोडणी कामगार गावांमध्ये दाखल झाल्यामुळे गावातलया आर्थिक उलाढालींना वेग आला आहे.
प्रत्येक वर्षी इथल्या कारखान्याजवळच्या व्यावसायिकांचा व्यवसाय वाढत असतो.जनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी पळपळ थांबली जाणार आहे,गावातच आता वाढे मिळतील.जो पर्यंत कारखाना चालू आहे तो पर्यंत चाऱ्याचा प्रश्न भेडसावणार नाही.