Ahilyanagar Map
Ahilyanagar Map

Ahmednagar Rename On Google Maps : यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच राज्यातील शिंदे सरकारने राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक घेतली होती. 13 मार्चला झालेल्या या बैठकीत शिंदे सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. यातला सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय म्हणजे अहमदनगरचे नामकरण. शिंदे सरकारने अहमदनगरचे नामकरण ‘अहिल्यादेवीनगर’ करण्याच्या प्रस्तावाला 13 मार्च 2024 ला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवीनगर करण्याचा निर्णय झाल्यानंतर लगेचच गुगल मॅप्स मध्ये अहमदनगरचे नाव ‘अहिल्यादेवीनगर’ असे झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु आजही महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अहमदनगरचे नाव बदलले नाही. त्यामुळे गुगलने तर आपले काम केले आहे परंतु महानगरपालिकेला त्याचा विसर पडला आहे का ? असा सवाल नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती घोषणा
अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर व्हावे अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त जामखेड तालुक्यातील चौंडी या त्यांच्या गावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरच्या नामांतरणाची घोषणा केली होती. यामुळे नामांतरणाचा हा मुद्दा आता निकाली निघणार असे वाटतं होते. दरम्यान मुख्यमंत्री महोदय यांनी घोषणा केल्यानंतर अहमदनगर महानगरपालिकेने देखील या चालू मार्च महिन्याच्या सुरुवातीला महापालिकेची सर्वसाधारण सभा घेऊन त्यामध्ये अहमदनगर शहराचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ असे नामांतर करण्याचा ठराव मंजूर केला. तसेच तो ठराव पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला होता. दरम्यान, महापालिकेच्या या ठरावानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहमदनगरचे नाव ‘अहिल्यादेवीनगर’ करण्याला मंजुरी देण्यात आली.

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ ऐवजी ‘अहिल्यादेवीनगर’ असे नामकरण
खरेतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी अहमदनगरच्या नामांतरणाची घोषणा केली त्यावेळी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ असेच म्हटले होते. मागणी करतांना आणि महापालिकेने ठराव करतांना देखील ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ असेच नाव सुचवले होते. परंतु मंत्रिमंडळाने निर्णय घेताना साधे-सोपे नाव असावे म्हणून ‘अहिल्यानगर’ असे करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच याबाबत माहिती मिळाली होती. एकंदरीत आता अहमदनगरचे नाव अहिल्यानगर असे झाले आहे. नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी यामुळे पूर्ण झाली आहे. गुगल मॅप्सवर देखील शहराचे नवीन नाव आता झळकले आहे. गुगल मॅप्सवर ‘अहिल्यानगर’ हे नाव शोभून दिसत आहे. तथापि, महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जुनेच नाव पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांच्या माध्यमातून महानगरपालिका गुगलचे अनुकरण केव्हा करणार हा मोठा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान आज आपण नामंतरणाची प्रक्रिया नेमकी कशी असते हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कशी असते नामांतरणाची प्रक्रिया
हे समजून घेण्याआधी आपण शहराचे, जिल्ह्याचे नाव बदलण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो का हे थोडक्यात समजून घेऊया. राज्याचे माजी महाधिवक्ते आणि कायदेतज्ञ श्रीहरी अनेक बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, अर्थकारणाच्या दृष्टीने एखाद्या शहराचे किंवा जिल्ह्याचे नाव व्यवस्थापकीय प्रक्रियेने बदलता येत. महसूल विभागाला तसा अधिकार आहे. त्यांच्या मंजुरीनंतर ही प्रक्रिया पार पडते. स्थानिक स्वराज्य संस्थांना देखील याचा ठराव करावा लागतो. मात्र पुढे बोलताना त्यांनी नामांतरणाचा संबंध महसूलाशी नसल्यास अन गावाचे, शहराचे, जिल्ह्याचे नामांतरण करायचे असल्यास हा मुद्दा राजकीय किंवा सामाजिक बनतो अशावेळी लोकांचे मत लक्षात घेतले पाहिजे, असे म्हटले आहे.

कायदेतज्ञ उल्हास बापट मात्र जिल्ह्याचे नाव बदलण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो असे म्हणतात. राज्याचे कायदेमंडळ अर्थातच विधिमंडळ आणि मंत्रिमंडळ जिल्ह्याच्या नावाचे नामांतर करू शकतात असे त्यांनी सांगितले आहे. पण, यासाठी काही विशिष्ट निकष नाहीत असे निर्णय राजकीय असू शकतात, असे देखील त्यांनी अधोरेखित केले आहे. तसेच एखादा जिल्हा किंवा शहराला आंतरराष्ट्रीय महत्त्व असेल किंवा तो राज्य आणि केंद्राच्या सामायिक यादीत असेल तर संबंधित नामांतरासाठी राज्य सरकारला केंद्राची मंजुरी आवश्यक राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. उदाहरणार्थ, एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवीन नाव द्यायचे असल्यास किंवा नामांतर करायचे असल्यास आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने हा प्रश्न केंद्र सरकारच्या अंतर्गत येईल, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत कोणते नाव झळकणार
काल लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुक अहमदनगर नावाने होणार की नवीन ‘अहिल्यादेवीनगर’ नावाने होणार हा देखील प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात होता. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव कॉम्रेड भैरवनाथ वाकळे यांनी जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांना हा प्रश्न विचारला होता. नुकतीच लोकसभा निवडणूक प्रक्रियेची राजकीय पक्षांना माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याच बैठकीत वाकळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, यावर उत्तर देताना अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी यंदा होऊ घातलेली लोकसभा निवडणूक अहमदनगर नावानेच होणार असे स्पष्ट केले आहे. यावेळी नामांतरणाची प्रक्रिया पूर्ण नसल्याने अहमदनगर नावानेच यंदा होऊ घातलेली लोकसभा निवडणूक लढवली जाणार असे त्यांनी म्हटले आहे.