पाथर्डी तालुक्यातील चितळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमत करून मोठा गैरव्यवहार केला असून, त्याची चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थ विष्णू चितळे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चितळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, चितळवाडी ग्रामपंचायतमधील सन २०२० ते २०२४ दरम्यान सरपंच व ग्रामसेवक यांच्या कालावधीमध्ये झालेल्या कामकाजाची व दफ्तराची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी,वित्त आयोग, आरोग्य अभियान, चितळवाडी ग्रामपंचायत इमारत व प्राथमिक शाळा कोठेवाडी शौचालयाचे काम झालेले नाही.
तसेच झालेली कामे अतिशय निकृष्ट दर्जाचे असून, काही कामे न करताच निधीची विल्हेवाट लावून मोठी अनियमितता केली.त्या कालावधीतील ग्रामसेवक बी. के. तिडके यांची बदली पाथर्डी पंचायत समिती येथून जामखेड पंचायत समिती येथे झाली आहे.
तरीही तिडके यांना पाथर्डी येथून कार्यमुक्त करून बरेच कालावधी होऊनही चितळवाडी ग्रामपंचायतीचा कार्यभार कोणत्याही ग्रामसेवकाला दिलेला नाही.त्यामुळे दैनंदिन कामकाजासाठी कोणाकडे जावे असा प्रश्र ग्रामस्थांसमोर निर्माण झाला आहे.
चितळवाडी ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करताना कोणत्याही शासकीय नियमांचे पालन करण्यात आले नाही.त्या जागेचे बक्षीसपत्र केले नसून इमारतीच्या जागेचा कोणताही शासकीय पुरावा चितळवाडी ग्रामपंचायतीकडे नाही.
इमारत बेकायदेशीर उभी केलेली आहे.त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामसेवक व सरपंच यांची आहे.दोघांच्या सहमतीने अनेक बेकायदेशीर कामे करून निधीचा अपहार केलेला आहे.
चितळवाडी ग्रामपंचायतमार्फत कोठेवाडी गावांतर्गत २५१५ निधीतून रस्ता खडी व मुरमीकरणाचे काम अत्यंत खराब व निकृष्ट दर्जाचे असून, रस्ता हा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नियंत्रणांतर्गत चालू आहे.
तरी रस्त्याचे बिल अदा करण्यात येऊ नये.या सर्व बाबींची चौकशी करून तातडीने कार्यवाही करावी; अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर विष्णू चितळे, मारुती चितळे, योगिता दीपक गायके, काशिनाथ चितळे, अंबादास चितळे, ज्ञानदेव कोठे, बाजीराव कोठे, तुकाराम कोठे, मुरलीधर कोठे आदींच्या सह्या आहेत.
चितळी ग्रामपंचायतीच्या बँकेच्या आर्थिक खात्याचे सरपंच व ग्रामसेवक यांचे सही नमुने अद्याप बदलेलेले नाही.ही बाब देखील गंभीर असून, भ्रष्टाचाराला वाव देणारी आहे.तसेच बँकेची उघडलेली खाती बंद करून नवीन ग्रामसेवकाचे सही नमुने घेण्यात यावे.
गटविकास अधिकाऱ्यांनी नेमलेल्या ग्रामसेविकेकडे ग्रामस्थ काम घेऊन गेले असता त्या सांगतात की, बी. के. तिडके ग्रामसेवकांनी माझ्याकडे अद्याप कार्यभार सोपविलेला नाही.
ग्रामसेवकांना येथून कार्यमुक्त केलेले असताना आजपर्यंत चितळवाडी ग्रामपंचायतीचा कार्यभार अद्यापपर्यंत तिडके यांच्याकडे आहे.ही बाब शासकीय दृष्ट्या गंभीर असून,आर्थिक अपहाराला वाव मिळणारी आहे.