टाकळीभान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी प्रसुतीसाठी आलेल्या आदिवासी महिलेला वैद्यकीय अधिकारी जागेवर हजर नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागल्याने याबाबतचे वृत्त प्रसिध्द झाल्याने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत काल चौकशीसाठी आलेल्या अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसमोर तक्रारींचा पाऊस पाडला.
तर येथील वैद्यकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची आठ दिवसात बदली करा,अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.टाकळीभान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या काही वर्षांपासून आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ झाल्याने रुग्णांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
दोन वैद्यकीय अधिकारी असूनही रुग्णांची हेळसांड होत असल्याने आरोग्य केंद्रांची भव्य वास्तु केवळ शोभेची वास्तू दिसून येते.गेल्या आठवड्यात रात्रीच्या वेळी आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी आलेल्या आदिवासी महिलेला उपचार तर सोडाच मात्र, उपचारासाठी पुढे जाण्यासाठी रुग्णवाहिकाही न मिळाल्याने अखेर उपसरपंच कान्हा खंडागळे व भाऊसाहेब पवार यांनी खासगी वाहन उपलब्ध करुन ग्रामीण रुग्णालयात महिलेला दाखल करण्यासाठी मदत केली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागरगोजे यांनी गंभीर दखल घेऊन काल अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहरकर यांची चौकशीसाठी नियुक्ती केल्याने त्यांनी या आरोग्य केंद्राला भेट दिली.यावेळी उपसरपंच कान्हा खंडागळे,भाऊसाहेब पवार, दिलीप लोखंडे, अक्षय कोकणे, आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी आरोग्य केंद्राच्या कामकाजाबाबत अक्षरशः तक्रारींचा पाऊस पाडत तालुका आरोग्य अधिकारी व येथील दोन्ही वैद्यकीय अधिकारी अकार्यक्षम असल्याने आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याने वारंवार तक्रारी वाढत आहेत.
त्यामुळे या सर्वांची बदली करण्यात यावी व कार्यक्षम अधिकारी नेमावेत.येत्या आठ दिवसात याबाबत निर्णय घेण्यात यावा, अन्यथा या मागणीसाठी आंदोलन हाती घेतले जाईल,असा इशारा दिला.
चौकशीसाठी आलेले डॉ. नेहरकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले.ग्रामस्थांच्याही तिव्र प्रतिक्रिया समजून घेत याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.