शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी महानगरपालिकेने नाशिक येथील एका खासगी संस्थेला ३६ रस्ते व जागांवर ‘पे अँड पार्क’ सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
यामध्ये जुन्या सिव्हिल हॉस्पिटलचा परिसर आरक्षित करण्यात आल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागनाथ चव्हाण यांनी महापालिकेला नोटीस पाठवून तत्काळ अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे.
जुन्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरतील अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ११ डिसेंबर रोजी महापालिकेला नोटीस पाठवली होती.परंतु, यावर कोणतीही कार्यवाही न करता महापालिकेने २४ डिसेंबरला ‘पे अँड पार्क’ सुरू करण्यास मंजुरी दिली.
यानंतर शुक्रवारी (दि. २८ डिसेंबर) पुन्हा महापालिकेला स्मरण पत्र देण्यात आले असून,जागा उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.जिल्हा आरोग्य विभागाच्या अंतर्गत जुने सिव्हिल रुग्णालय परिसर आहे.
या परिसरात सेवा अभियंता, जिल्हा कार्यशाळा, आरोग्य सेवा परिवहन, असे तीन शासकीय कार्यालय आणि आरोग्य कर्मचारी निवासस्थान आहे.
जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णवाहिका व पर्यवेक्षिका वाहने या कार्यालयात दुरुस्तीसाठी व इतर तांत्रिक कामासाठी वेळोवेळी येतात.हा परिसर शहराच्या मध्यवर्ती व मार्केटच्या परिसरात असल्याने येथे खाजगी वाहनांची पार्क करण्यासाठी नेहमी वर्दळ असते.
तसेच, दिवाळी, इतर महत्त्वाचे सण व लग्णसराईमध्ये खासगी वाहनांमुळे शासकीय वाहने व रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी कार्यशाळेत आणताना बरीच कसरत करावी लागते.
त्यामुळे या परिसरातील अतिक्रमण पाहणी करून तत्काळ काढण्यात यावे,अशी मागणी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातून जिल्ह्यासाठी १०० खाटांचे माता आणि बाल आरोग्य रुग्णालय (एमसीएच) मंजूर झाले आहे.यासाठी २५.४५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
या प्रकल्पासाठी फेब्रुवारी २०२३ साली निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती.परंतु,जागा उपलब्ध न झाल्याने निविदा प्रक्रिया रद्द केली आहे.जागा अंतिम झाल्यानंतर पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.
राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य अभियानातून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी १७ जानेवारी २०१३ साली १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयाला बृहत आराखड्यात मंजुरी मिळाली आहे.यासाठी ९७ पदांना देखील मान्यता आहे.
परंतु, रुग्णालयाचे बांधकाम करुन पुढील प्रक्रिया राबवण्यासाठी निधी मंजूर झालेला नाही.या रुग्णालयासाठी तीन ते साडेतीन एकर जागा आणि १८ कोटीपर्यंत निधी अपेक्षित आहेत.
तत्कालीन खासदार दिलीप गांधी यांनी या स्त्री रुग्णालयासाठी जुन्या सिव्हिल हॉस्पिटलची जागा प्रस्ताव दिला होती.परंतु,तांत्रिक अडचण आल्याने त्यावर निर्णय झाला नाही.