‘कोविड १९’ महामारी दरम्यान घरपोच औषधे पुरवण्यासाठी दिलेली विशेष परवानगी,ज्याचा सध्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म कडून गैरवापर होत आहे,यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाला असून २०२० मध्ये काढलेली परवानगीची अधिसूचना मागे घ्यावी,अशी मागणी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट्स अॅण्ड ड्रगिस्ट्स असोसिएशनने केली आहे.
अधिसूचना मागे घ्यावी अन्यथा प्रत्येक राज्यात हल्लाबोल मोर्चासह देशव्यापी बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.मार्च २०२० मध्ये बंदमुळे राज्यासह देशात केंद्र सरकारने अधिसूचना काढत ऑनलाईन औषध खरेदीला परवानगी दिली होती.
मात्र, आता २०२४ मध्ये ही विशेष अधिसूचना केंद्र सरकारने मागे घेतलेली नाही.देशात एकूण १२.४० लाख औषध विक्रेते आणि वितरकांचे प्रतिनिधी आहेत.कोविड महामारी दरम्यान सरकारने घरपोच औषध पुरवण्यास परवानगी दिली होती आणि काही नियम,जसे की औषध विक्रीसाठी प्रिस्क्रिप्शनवर शिक्का मारणे (नियम ६५) यांना विशिष्ट परिस्थितीतून सूट देण्यात आली होती.
या अधिसूचनेचा उद्देश स्थानिक औषध विक्रेत्यांमार्फत आपत्कालीन परिस्थितीत औषध डिलिव्हरी करणे होता.मात्र, आता स्विगी आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे आवश्यक नियामक उपायांचे पालन न करता घरपोच औषधे पुरवण्यासाठी याचा गैरवापर केला जात आहे.
हे सर्व अवैध प्लॅटफॉर्म वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री करत आहेत,ज्यामुळे स्व-चिकित्सा,नशेच्या औषधांचा गैरवापर आणि प्रतिजैविक प्रतिकारशक्ती (एएमआर) यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत.
अशा अवैध प्लॅटफॉर्म फक्त त्यांच्या नफ्यावर लक्ष केंद्रित करत असून रुग्णांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत आहेत.या अधिसूचनेचा मूळ उद्देश परवानाधारक जवळच्या औषध विक्रेत्यांना विशिष्ट परिस्थितीत डिलिव्हरीसाठी परवानगी देणे हा होता.मात्र,ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे महत्त्वाच्या सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केले जात आहे,असे केमिस्ट संघटनेचे राज्याचे सचिव अनिल नावंदर यांनी सांगितले.
दि महाराष्ट्र राज्य केमिस्ट्स अॅण्ड ड्रगिस्ट्स असोसिएशन, अहमदनगर जिल्हा केमिस्ट्स आणि ड्रगिस्टस आक्रमक असून सरकारने याप्रश्नी तातडीने लक्ष घालावे,अशी मागणी जिल्हा केमिस्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांनी केली आहे.औषध विक्री आणि वितरणासाठी प्रिस्क्रिप्शन आणि इतर सुरक्षा नियमांचे कायद्यातील तरतुदीनुसार कठोर पालन सुनिश्चित करावे,असे त्यांचे म्हणणे आहे.
ऑनलाईन औषध घेताना औषधाचे प्रिस्क्रिप्शन खरे की खोटे हे कसे ठरवणार असा प्रश्न आहे.एकाच व्यक्ती अनेक ऑनलाईन कंपन्यांना एकच प्रिस्क्रिप्शन पाठवून औषध विकत घेवू शकतात.तसेच संबंधित प्रिस्क्रिप्शन खरे की खोटे हे ऑनलाईन कंपनी कसे ठरवणार,असा प्रश्न केमिस्ट्स अॅण्ड ड्रगिस्ट्स असोसिएशनने उपस्थित केला आहे.