मृदा व जलसंधारण विभाग गत काही वर्षांपासून मजूर संस्थांमार्फत बंधाऱ्यांच्या सर्वेक्षणाची कामे करीत आहे.मजूर संस्थांनी नेमके काय सर्वेक्षण केले,याची माहिती या विभागाकडे मागितली असता,या मोजमाप पुस्तिका देण्यास हा विभाग टाळाटाळ करीत आहे.

मजूर संस्था या अंगमेहनतीचे कामे करतात.मात्र, जिल्ह्यात अनेक मजूर संस्थांना अंगमेहनतीच्या कामांशिवाय कार्यालयांचे अंदाजपत्रक बनविणे, बंधाऱ्यांच्या कामांचे सर्वेक्षण करणे,अशी लाखो रुपयांची कामे देण्यात आली आहेत.

ही कामे अंगमेहनत या सदरात मोडत नसताना ती मजूर संस्थांना कशी दिली गेली? हा प्रश्न उपस्थित केला जात असून या कामांवर लाखो रुपये खर्च झाले आहेत.मात्र,कार्यकारी अभियंत्यांपासून मुख्य अभियंत्यांपर्यंत सगळेच या चौकशीस टाळाटाळ करीत आहेत.

जलसंधारण विभागाने मजूर संस्थांमार्फत जी बंधाऱ्यांच्या सर्वेक्षणाची कामे केली, त्या कामांच्या मोजमाप पुस्तिकेची मागणी या कार्यालयाकडे केली असता,या मोजमाप पुस्तिका छ. संभाजीनगर येथे वरिष्ठ कार्यालयाला पाठविल्या आहेत, असे कारण देत संबंधित अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

यासंदर्भात या विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग गायसमुद्रे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले,मोजमाप पुस्तिका कोठे आहेत ते शोधून त्या उपलब्ध करून दिल्या जातील.प्रत्यक्षात गायसमुद्रे देखील ही माहिती उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे या कामांबाबत संशय निर्माण झाला आहे.

अहमदनगर पाटबंधारे विभागात मजूर संस्थांमार्फत झालेली कामे संशयास्पद आहेत.यासंदर्भात अधीक्षक अभियंत्यांनी कार्यकारी अभियंत्यांकडून चौकशी अहवाल मागविला आहे.

कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी प्रतिक्रिया देत ही चौकशी सुरू असून, त्यासाठी आपण एका अधिकाऱ्याची नियुक्त्ती केली आहे, असे ते म्हणाले.

जलसंपदा विभागाच्या जिल्ह्यातील विविध कार्यालयांत मजूर संस्थांमार्फत अनेक वर्षापासून बेकायदेशीर कामे करण्यात आली आहेत.कामे करताना या संस्थांच्या नावे काही अधिकारीच निधी लाटत असल्याची चर्चा आहे.

मजूर संस्थांच्या नावाने बिलं निघाली,पण हे पैसे मजुरांच्या खात्यावर गेले आहेत का,याचे वास्तव चौकशीतून समोर येईल. पण अशी चौकशी करण्यास टाळाटाळ सुरु आहे.यातील काही विभागांतील कामांच्या चौकशीचे आदेश निघाले.मात्र, या चौकशीतही सारवासारव करण्याचा प्रयत्न आहे.