कापूस व तुरीला १५ हजार, उसाला ५ हजार तर सोयाबीनला ११ हजार भाव मिळावा,मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने गुरुवार (दि. १९) डिसेंबर सकाळी ११ वा. तहसील कार्यालय, मार्केट कमिटी, या ठिकाणी निदर्शने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी अॅड. सुभाष लांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
अॅड. लांडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,सध्या शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन,तूर विक्रीसाठी आलेले आहेत, या काळात खासगी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची अक्षरशः लूट चालवली आहे.
मागील वर्षी तुरीला अकरा हजार रुपयापर्यंत तर दोन वर्षांपूर्वी कापसाला अकरा हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता.चालू वर्षी मात्र तूर, कापूस, सोयाबीन यांचे भाव खूपच पाडण्यात आले आहेत.जिल्हयाबाहेर उसाला विनय कोरे यांच्या कारखान्याने पहिली उचल ४३०० रुपये जाहीर केली आहे.
संगमनेर व काही कारखाने ३५०० रुपायांपर्यंत भाव देतात; परंतु आपल्या परिसरातील कारखाने तीन हजार रुपयांच्या आत भाव देत आहेत, हे शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे.सर्व वस्तूंची भाववाढ होत असताना शेतकऱ्यांना मात्र हमीभाव मिळत नाही.
शेतीमाल उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना शेतकऱ्यांकडे माल आल्यावर मात्र भाव पाडले जातात,म्हणून सरकारने हमीभाव कायदा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.यासाठी किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वतीने गुरुवार दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, मार्केट कमिटी या ठिकाणी निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाची आज शेवगाव येथे बैठक झाली, या वेळी कॉ. अॅड सुभाष लांडे, संजय नांगरे, बापूराव राशिनकर, भगवानराव गायकवाड, बबनराव पवार, संदीप इथापे, राम लांडे, बबनराव लबडे, दत्ता आरे, वैभव शिंदे
बाळासाहेब म्हस्के, आत्माराम देवढे, अशोक नजन, कारभारी वीर, अॅड. भागचंद उकिर्डे, अविनाश गायकवाड, गोरक्षनाथ काकडे, नारायण भिसे, शिवाजी भुसारी, अर्जुन खैरे आदी उपस्थित होते.
या आंदोलनास शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आणि शेतकऱ्यांची एकता आणि ताकद शासनाला दाखवून द्या, असे आवाहन अॅड. सुभाष लांडे, संजय नांगरे, संदीप इथापे, किसान सभेचे बबनराव पवार व राम लांडे यांनी केले आहे.