शहरालगत असलेल्या नगर-कल्याण रोडवरील विद्या कॉलनीत सुरु असलेल्या डी.पी. रस्त्याच्या खोदाई कामामुळे ड्रेनेज लाईन फुटल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कल्याण रोड येथील विद्या कॉलनीत अनुसयानगर ते सीना नदी डीपी रोडचे काम गेल्या दोन महिन्यापासून बंद स्थितीत आहे.जेसीबीच्या खोदकामामुळे सर्व रस्त्याच्या बाजूला रहिवासींचे ड्रेनेज लाईन फुटले आहेत.

त्यामुळे सर्व मैलामिश्रीत पाणी रस्त्याच्या कामासाठी करण्यात आलेल्या खड्ड्यात साचून दुर्गंधी पसरली आहे.पाण्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने,थंडी-तापाचे रुग्ण वाढत आहे.तर साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.

ड्रेनेज लाईन बरोबरच काही ठिकाणी पिण्याची पाईपलाइन देखील फुटली असल्याने नळाद्वारे मैलमिश्रीत पाणी येत आहे. कल्याण रोड भागामध्ये फेज टू चे पाणी सुरु करण्यात आले असून,पाणी कमी दाबाने येत असल्याने नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न देखील बिकट होत चालला आहे.

रस्त्याचे काम बंद असल्याने व मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे मैलमिश्रीत पाणी घरांसमोर साचले गेल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.मनपा प्रशासनाने तात्काळ या प्रश्नाची दखल घेतली.

कोणत्याही रोगराईचा फैलाव होणार नाही,या दृष्टीकोनाने संबंधित विभागाला सूचना देऊन ड्रेनेजलाईन व पाण्याची लाईनचे काम सुरळीत करुन करुन देण्याची मागणी नागरिकांच्यावतीने निवेदनाव्दारे करण्यात आली आहे

यावेळी आप्पासाहेब सोनवणे, ठकाजी जगधने, चंद्रभान देव्हडे, कुशाबा होडगर, तुषार होडगर, तुकाराम टेकाळे, अशोक चौधरी, सतीश केदार, प्रभाकर शिंदे, विजय कांडेकर, अशोक सावरे, पोपट शिंदे, नामदेव ठुबे, राजू शेळके, संजय शेळके, किरण शेळके, मदन काशीद, रोहिदास कोल्हे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.