राहुरी येथील अहिल्यानगर- मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी ही नित्याची बाब बनली आहे.महामार्गावर सिग्नल यत्रंणा बसविण्यात आली,मात्र ती बंद पडली आहे.महामार्गावर क्वचित कधीतरी वाहतूक शाखेचे कर्मचारी दिसतात.एकूणच वाहतूक कोंडीच्या समस्येने प्रवासी अन् वाहन चालक वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे.
येथील जुने बसस्थानक, मल्हारवाडी चौक व पाण्याची टाकी येथे सिग्नल यंत्रणेचा प्रयोग करण्यात आला होता.ते आता बंद पडले आहेत.अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.खासगी प्रवासी वाहतूक करणारी चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी केली जातात.
यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.काही वाहन चालक बेशिस्तपणे वाहने रस्त्यावरच उभी करतात.याकडे पोलिस प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत तर नाही ना ? असा प्रवासी वर्गातून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर जुने बसस्थानक,नवी पेठ चौक,पाण्याची टाकी येथील सिग्नल यंत्रणा बंद आहे.त्यामुळे वाहतुकीच्या नियमांची पायमाल्ली होत आहे.यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असून नोकरदार, विद्यार्थी व इतर प्रवाशांना शाळा,महाविद्यालय तसेच कार्यालयीन कामासाठी इतरत्र ठिकाणी जाण्यासाठी नेहमीच उशीर होतो.वाहतूक कोंडीमुळे सर्वाचीच गैरसोय होत आहे.प्रशासनाने ही कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करावा.
राहुरी शहरामध्ये नवी पेठेत पालिकेसह पोलिस प्रशासनाने केलेल्या विनंतीवरून पार्किंग रेषा आखून दिल्याने नवी पेठेत वाहतुकीला शिस्त लावणे शक्य झाले आहे.नगर-मनमाड महामार्गावर शहर हद्दीत पांढऱ्या साइडपट्ट्या मारल्यास बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यास सोयीचे होईल असे संजय ठेंगे (पोलिस निरीक्षक) यांनी सांगितले.
राहुरी शहरामधील नगर-मनमाड राष्ट्रीय राज्य महामार्गाला दुभाजक नाहीत.यामुळे सिग्नल बंद आहेत.दुभाजक झाल्यास सिग्नल सुरू करण्यात येतील असे ज्ञानेश्वर ठोंबरे (मुख्याधिकारी) यांनी सांगितले.