नगर शहरातील भोसले आखाडा परिसरातील एका धार्मिक स्थळात गुरुवारी (दि.१२) सकाळी संशयीत बांगलादेशी इसम घुसल्याची अफवा पसरली.याबाबत माहिती मिळताच कोतवाली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी सर्व ७ ते ८ संशयितांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. तेथे त्यांची कसून चौकशी केल्यावर ते सर्व भारतीयच असून, इज्तेमासाठी मध्यप्रदेशातील भोपाळ येथून नगरला आले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भोसले आखाडा परिसरात असलेल्या एका धार्मिक स्थळात ७ ते ८ अनोळखी इसम जाताना परिसरातील नागरिकांनी पाहिले.ते नगर शहरातील नसल्याने आणि यापूर्वी त्यांना या ठिकाणी पाहिलेले नसल्याने नागरिकांना ते बांगलादेशी घुसखोर असावेत,असा संशय आला.
त्यामुळे परिसरातील नागरिक त्या धार्मिक स्थळाजवळ गोळा झाले.काही नागरिकांनी त्यांना तुम्ही कोठून आलात ? अशी विचारणा केल्यावर आम्ही भोपाळ येथून आल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे नागरिकांचा संशय आणखीच बळावला.
अनेकांनी शहरात इकडे, तिकडे फोनाफोनी सुरु केली. काही नागरिकांनी कोतवाली पोलिसांना फोन करून माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी गेले.त्यांनी त्या इसमांना ताब्यात घेत चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले.
त्यांच्याकडे बराच वेळ चौकशी करण्यात आली त्यांच्याकडील आधार कार्डची तपासणी करून भोपाळ येथे संपर्क साधून माहिती घेण्यात आली.
चौकशीअंती ते सर्वजण भारतीयच असल्याचे समोर आल्यावर त्यांच्याकडून त्यांची सर्व माहिती तसेच ते नगरला कशासाठी आले,किती दिवस राहणार, पुन्हा कधी परत जाणार ? ही माहिती लिहून घेतल्यावर त्यांना सोडून देण्यात आले असल्याचे कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले.