यावेळी सुरुवातीपासूनच महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला.आता पावसाळा संपून हिवाळा लागला असून महाराष्ट्रात सध्या वातावरणात थंडावा जाणवू लागला आहे.
थंडीची चाहूल लागली असून वातावरणात गारठा वाढायला लागला आहे.तसेच गव्हाच्या पिकासाठी सध्या वातावरण पोषक असल्यामुळे गव्हाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे.
उत्तर दिशेकडून येणाऱ्या गारव्यात गेल्या दोन दिवसा पासून प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळत आहे.त्यामुळे कोपरगावकरांना थंडीने हैराण करायला सुरुवात केली आहे कारण सध्या कोपरगावातील तापमान १४ अंशावर गेले आहे.
सध्या उबदार कपड्यांची मागणी वाढु लागली असून कोपरगावातल्या कपड्यांच्या दुकानात नागरिक गरम कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी करू लागले आहेत. तसेच रस्त्यावरच्या नेपाळी बंधूंकडे कपडे खरेदीसाठी गर्दी दिसू लागली आहे.
एवढेच नव्हे तर सर्दी, ताप,खोकल्याच्या त्रासाने खासगी दवाखान्यात सुद्धा लोक गर्दी करू लागले आहेत.महाराष्ट्रात वीस ठिकाणांपेक्षा जास्त ठिकाणी पंधरा अंशाच्या खाली तापमान गेल्याचे आढळून आले होते.
उबदार कपडे खरेदीला ग्राहकांनी गर्दी करायला सुरूवात केली आहे,तर कुटूंबातील आजीबाई खारीक, खोबरे, बदाम, काजू, साजुक तुपातील डिंकाचे पौष्टिक लाडू बनवण्याच्या तयारीला लागल्या आहेत.थंडीत या पौष्टिक पदार्थांमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.
कोपरगावातील ग्रामीण भागातील नागरिक थंडीमध्ये शेकोट्या पेटवून थंडीचा आनंद घेत आहेत.उसतोडणी कामगार,दुग्ध उत्पादक शेतकरी आणि कामगार थंडीपासुन संरक्षण करण्यासाठी उबदार कपडे, स्वेटर, मफलर, कानटोपी वापरू लागले आहेत.
पंजाबराव डख यांनी वर्तविलेलया हवामान अंदाजात बदल झालेला पहायला मिळत आहे.तसेच नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये पावसाचा अंदाज सांगितलेला आला आहे.
या वेळच्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना खरीप पिकात लॉटरी लागल्याने त्यांची दिवाळी मजेत गेली,कांद्याचे भाव वाढल्यामुळे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांवर चांगले दिवस आल्याचे बघायला मिळाले.