अकोले तालुक्यातल्या शेंडी गावात काही दिवसांपासून बिबट्याने दहशत माजविली होती.बिबट्याने गावातील प्राण्यांना शिकार बनवले होते त्यामुळे स्थनिक लोकही बिबट्याच्या भीतीमुळे घराच्या बाहेर जायला घाबरत होते.वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकला असल्यामुळे आता लोक बिबट्याच्या दहशतीमधून विसावले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,शेंडी मध्ये राहणारे गोगाशेट भांगरे यांच्या वस्तीच्या आसपास उसाचे भरपूर क्षेत्र आहे.त्या उसात बऱ्याच दिवसांपासून बिबट्या लपून बसल्याचे आढळले होते.

शेतात लपून बसलेल्या बिबटयाने भांगरे यांच्या वस्तीमधील चार पाळीव कुत्रे, तीन मांजरे तसेच कोंबड्यांची शिकार करून आपले पोट भरले होते.

हा बिबट्या भरदिवसा आणि संध्याकाळी सहा वाजता भांगरेंच्या वस्तीत बिनधास्त फिरताना बऱ्याच लोकांनी पाहिल्यामुळे येथील लोक भीतीने बाहेर फिरणं बंद करू लागले होते.

भांगरे यांनी राजूर मधील प्रादेशिक वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे व वनपाल पटेल यांना माहिती देवून पिंजरा लावण्याची मागणी केली होती.रविवारी भांगरे यांच्या वस्तीजवळ राजूरच्या प्रादेशिक वन विभागाने पिंजरा लावला होता.

काल सोमवारी संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती प्रादेशिक वन विभागाकडून मिळाली.

राजूर येथील प्रादेशिक वनविभागाने शेंडी येथे लावलेल्या पिंजऱ्यामध्ये कैद झालेला हा बिबट्या तीन वर्षांचा असल्याचे कळले आहे.बिबट्याच्या अटकेची बातमी ऐकून गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.