राहातेकरांना २४ तास शुध्द पिण्याचे पाणी देण्यासाठी नगरपरिषदेने फिल्टरेशन प्लांटसाठी जागा बघण्याची कारवाई सुरू केली असून नगरविकास खात्याच्या माध्यमातून यासाठी लवकरच निधी मंजूर करणार असल्याची माहिती डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
माजी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने राहाता नगरपरिषदेच्या सध्याच्या नादुरुस्त असलेल्या जलशुद्धी प्रकल्पासाठी १ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर करून पाणीपुरवठा विभागाचे नादुरुस्त असलेले ढवळणी यंत्र, सेंड बैंड, ब्लोअर मशनरी, ट्यूब जाळ्या, ३० एचपीच्या ४ मोटर, दोन अत्याधुनिक पाण्याचे हौद
एम.एस ग्रील जाळ्या, क्लोरीन गॅस युनिट आशा विविध पद्धतीच्या अत्याधुनिक यंत्रणा मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी पाणीपुरवठा विभाग प्रमुख अशोक साठे व कर्मचाऱ्यांच्या साह्याने तात्काळ याठिकाणी बसवून शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचे नियोजन सुरू केले आहे.
सोमवारी या अत्याधुनिक जल शुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.डॉ. सुजय विखे म्हणाले नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची अत्यंत वाईट दुरवस्था झाली होती. नागरिकांना याआधी २२५० टीडीएस असलेले पिण्याचे पाणी वितरण केले जात असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
या गोष्टीची माहिती मला समजताच मी तात्काळ ना. विखे पाटील साहेब यांना याठिकाणी नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी तात्काळ निधी मंजूर करण्याची विनंती केली.
नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाची दखल घेऊन नगरपरिषदेला या कामासाठी १ कोटी ३० लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आज राहाता शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी वितरण करण्याचे काम सुरू झाले असून सध्या वितरण करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा टीडीएस ३५० ते ४५० आहे.
परंतु लवकरच याठिकाणी जलशुध्दिकरण युनिट बसवल्यानंतर पिण्याच्या पाण्याची शुद्धता अजून वाढणार आहे.सध्या शहराला ३ दिवसा आड पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो त्याकरिता आठवड्यात ६० लाख लिटर पाणी उपलब्ध करावे लागते शहरातील नागरिकांना २४ तास शिर्डी प्रमाणे पिण्याचे पाणी देण्याकरिता राहाता नगरपरिषदेला नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याकरिता व पाणी साठवण तलावासाठी जागा.
तसेच शहरात ज्या ठिकाणी पाईपलाईन नाही त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन पाणी साठवण करण्यासाठी अधिक पाण्याच्या टाक्या वाढवणे आदी कामे करण्यासाठी सूचना दिल्या असून नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर लगेचच नगररचना विभागाच्या मंत्री महोदयांशी बोलून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले सध्याचा नादुरुस्त असलेला जलशुध्दीकरण प्रकल्प सुरू करून नागरिकांच्या जिवाळ्याचा प्रश्न आपण सोडू शकलो याचा मला मनस्वी आनंद झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या समवेत जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करून त्यांच्याबरोबर शहराच्या विविध विकास कामांबाबत चर्चा केली.
यावेळी कैलास सदाफळ, डॉ. स्वाधीन गाडेकर, राजेंद्र वाबळे, सागर सदाफळ, पांडुरंग तुपे, सचिन मेहेत्रे विशाल गाडेकर, दशरथ तुपे, मिलिंद बनकर, राजेंद्र जेजुरकर आदींसह नागरिक उपस्थित होते.