तालुक्यामध्ये बिबट्यांकडून होत असलेल्या पशुधनांच्या शिकारीचा विषय शेतकऱ्यांसाठी चिंतेचा ठरत आहे.एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ या नऊ महिन्याच्या कालावधीतच सुमारे १०० वरून अधीक पशुधनाच्या शिकारी बिबट्यांकडून करण्यात आलेल्या आहेत. बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पशुधन मालकांना जवळपास बारा लाख रुपयांची मदत वनविभागाकडून देण्यात आली आहे.
तालुक्यात गर्भगिरीच्या डोंगर रांगा मोठ्या प्रमाणात विखुरलेले असल्याने या भागात वन्यप्राण्यांची मोठी संख्या आढळते. हरीण, काळवीट, लांडगा, कोल्हा, तरस, ससा, साळींदर, उदमांजर, रानडुक्कर, रानमांजर, मोर तसेच जातींचे पक्षी व सरपटणारे विविध प्राण्यांची संख्या लक्षणीय अशी आहे.उपलब्ध पाणी, लपण व खाद्य मिळत असल्याने हा परिसर बिबट्यांसाठी नंदनवन ठरत आहे.
गेल्या पाच वर्षांपासून तालुक्यातील बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.त्यांच्या वाढत्या संख्येमुळे रानडुकरांच्या संख्येत घट होत असली तरी बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांच्या होणाऱ्या शिकारीमुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये तालुक्यात सुमारे १०० वरून अधीक पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडलेल्या आहेत.
यामध्ये विशेषतः गाय, घोडा, शेळी, मेंढी यांच्यावर बिबट्यांकडून हल्ले करण्याचे प्रकार वाढले आहेत.वनविभागाच्या वतीने पंचनामे करण्यात येतात, त्यानुसार पशुपालकांना आर्थिक मदतही मिळत असते.नऊ महिन्याच्या कालावधीत तालुक्यातील पशुपालकांना ११ लाख ५२ हजार ५० रुपयांची आर्थिक मदत वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
सन २०१८-१९ दरम्यान तालुक्यात बिबट्याचे वास्तव्य क्वचितच आढळून येत असे.परंतु गेल्या पाच वर्षात विशेषता कोरोना काळापासून तालुक्यात बिबट्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे.बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांची शिकार हि नित्याचीच बाब होऊन बसली आहे.
शासकीय नियमानुसार ज्या पाळीव प्राण्यांपासून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळते अशा पाळीव प्राण्यांची शिकार वन्यप्राण्यांकडून करण्यात आली तरच मदत मिळत असते तालुक्यात अनेक पाळीव कुत्र्यांच्या शिकारी बिबट्यांकडून केलेल्या आहेत.
तसेच वनविभागाच्या हद्दीमध्ये वन्यप्राण्यांसाठी हे क्षेत्र संरक्षित असल्याने या हद्दीत पाळीव प्राण्यांची शिकार केली गेली तरी देखील त्या घटनेचा पंचनामा अथवा संबंधित पशुमालकांना मदत मिळत नाही. अशा घटना देखील अनेक घडलेल्या आहेत.
पावसाळ्यात शेजारील नेवासा व राहुरी तालुक्यातील उसाच्या क्षेत्रामध्ये पाणी साचल्यानंतर त्या परिसरातील बिबटे नगर तालुक्यातील डोंगर पठारावरील भागात स्थलांतर करत असतात.त्यामुळे पावसाळ्यात तालुक्यातील बिबट्यांची संख्या वाढत असून याच दरम्यान पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना देखील वाढत असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
बिबट्या हा साधारणपणे त्याच्या उंची पेक्षा कमी असणाऱ्या प्राण्यांवर हल्ला करत असतो.त्याची शिकारीची वेळ शक्यतो पहाटे व सायंकाळच्या दरम्यान असते. नागरिकांनी शेतात काम करताना मोबाईलवर मोठ्याने गाणे लावणे, टॉर्च, काठीचा वापर करावा. तसेच मजुरांनी ग्रुपने काम करावे.लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी.
बिबट्यांची संख्या कमी असताना त्यांच्या संरक्षणाबाबत कठोर कायदे करण्यात आलेले आहेत.मात्र गावोगावी तसेच शहरी व मानवी वस्तीत देखील बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांची होणारी शिकार तसेच अनेक चिमुरड्यांचाही बळी घेण्यात आला आहे.त्यामुळे बिबट्यांच्या नियंत्रणाबाबत शासनाने वेळीच दखल घेण्याची गरज आहे.
जेऊर, अकोळनेर, देहरे, विळद, चास, आगडगाव, खोसपुरी,आढाववाडी, धनगरवाडी, इमामपूर, चापेवाडी, ससेवाडी या परिसरात मोठ्या प्रमाणात पाळीव प्राण्यांचे शिकार बिबट्याकडून करण्यात आलेल्या आहेत.
वनविभागाच्या वतीने गावोगावी बिबट्या बाबत जनजागृती करण्यात येत आहे.बिबट्याने पाळीव प्राण्यांच्या शिकारी मोठ्या प्रमाणात केल्या असल्या तरी मानवावरील हल्ले तालुक्यात झाले नसल्याने ही समाधानाची बाब आहे.
ज्या भागात पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडत आहेत अशा ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी सहजासहजी पिंजराही लावण्यात येत नाही.पिंजरा लावण्यासाठी परवानगी घेण्यासाठी वनविभागाला देखील किचकट प्रक्रिया पार पाडावी लागते.त्यामुळे नागरिकांनी मागणी करून देखील पिंजरा लावण्यात येत नाही.त्यामुळे नागरिकांमधून देखील नाराजी व्यक्त करण्यात येत असते.