राहाता तालुक्यातील गणेशनगर- वाकडी- श्रीरामपूर रस्त्याच्या दुरुस्तीची हेळसांड अद्याप थांबलेली नाही.गेल्या दहा ते बारा वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे.विशेष म्हणजे या १२ किलोमीटर रस्त्यासाठी चक्क आठ ठेकेदार नेमण्यात आले.
तरीही या रस्त्याचे काम अपूर्णच आहे.या रस्त्याचा नियमित वापर करणारे प्रवासी, वाकडी येथील खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक, शिर्डी व शिंगणापूर तीर्थक्षेत्राला जाणारे भक्त, तसेच स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
शेतकरी संघटनेचे रुपेंद्र काले, वाकडी व धनगरवाडी ग्रामस्थ, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी वाकडी, धनगरवाडी व गणेशनगर ग्रामस्थांसोबत रास्ता रोको आंदोलन केले.तसेच, दत्तनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी लोकशाही मार्गाने मुंडण आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
या सर्व प्रयत्नांनंतर प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सकारात्मक पावले उचलली.आमदार राधाकृष्ण विखे पाटील व आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांतून गणेशनगर ते वाकडी येथील गोदावरी कालव्यापर्यंतच्या पाच किलोमीटर रस्त्यासाठी साडेचार कोटी रुपये मंजूर करण्यात आले; मात्र सोलापूर येथील कंपनीने वर्क ऑर्डर निघाल्यानंतरही वर्षभरात केवळ एक थराचे काम केले.
अद्याप खडीकरण व डांबरीकरणाची कामे रखडली आहेत.गोदावरी कालव्यापासून यश लॉन्स मंगल कार्यालयापर्यंतच्या ६०० मीटर रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ६२ लाख रुपये मंजूर झाले आहेत.वर्क ऑर्डर निघून सहा महिने झाले असतानाही फक्त खडीकरण झाले आहे.
यश लॉन्स ते धनगरवाडी फाट्यापर्यंतच्या एका किलोमीटर रस्त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून,हे काम पूर्ण झाले असले तरी तीन महिन्यांतच रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
राहाता तालुक्याच्या धनगरवाडी फाट्यापासून श्रीरामपूर तालुक्यातील यशवंतबाबा चौकीपर्यंतच्या दोन किलोमीटर अंतरासाठी एक कोटी रुपये मंजूर झाले आहेत; परंतु सहा महिन्यांपूर्वी वर्क ऑर्डर निघूनही फक्त खड्डे बुजविण्याचे काम झाले आहे.
याशिवाय यशवंतबाबा चौकी ते दत्तनगर फाटा या चार किलोमीटर रस्त्यावर केवळ डागडुजी करण्यात आली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत,अशी नागरिकांची मागणी आहे.अन्यथा, ग्रामस्थांनी आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.