काही दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यात साकुर मध्ये भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा पडल्याची घटना समोर आली होती.त्या दरोड्यात पाच ते सात दरोडेखोरांचा समावेश होता.त्यातील पाच दरोडेखोर पोलिसांच्या अटकेत आहे.
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकुर येथे ज्वेलर्सच्या दुकानावर भरदिवसा दरोडा टाकूण लाखोंचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या पाच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना यश आले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील साकुर येथील कान्हा ज्वेलर्समध्ये दि. ११ नाव्हेंबर रोजी भर दुपारी अज्ञात ५ इसमांनी दुकानामध्ये प्रवेश करत गावठी कट्टयाचा धाक दाखवून ५२ लाख ४१ हजार ६०० रूपये किंमतीचे सोने व चांदीचे दागीने चोरी करून गोळीबार करत पळून गेले होते.
त्या दरोडेखोरांना पोलिसांनी श्रीगोंद्यातील बेलवंडी मधून ताब्यात घेतले आहे.त्यातील दोघे दरोडेखोर अजूनही फरार आहेत.अटक केलेल्या पाच जणांकडून पोलिसांनी २० तोळे सोने आणि १५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.त्यांना पुढील तपासासाठी घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे सांगितले आहे.
या बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व तांत्रिक विशेषणाच्या आधारे गुन्हयामध्ये मनोज साठे, रा. माळशिरस, जि. सोलापूर याला पकडून त्याचा व गुन्हयातील चोरी मनोज साठे याने केली असल्याचे तपासात पुढे आले.
दरम्यान पोलिस चोरीला गेलेल्या मुद्देमालाबाबत तपास करत असताना यावेळी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मनोज साठे याने गुन्हयातील चोरी केलेले सोने त्याचा साथीदार धोंड्या जाधव, व सुनिल उर्फ निल चव्हाण यांच्याकडे विकण्यासाठी दिला आहे.
या माहितीवरून तपास पथकाने पुण्यात जाऊन संशयीताचा शोध घेतल्यावर सुनिल उर्फ निल विजय चव्हाण हा इसम पोलिसांच्या हाती लागला.त्याच्याकडे विचारपुस केली असता त्याने गुन्हयातील दागीने अभिषेक महेश तळेगावकर रा. रविवार पेठ, पुणे याच्याकडे विकण्यासाठी दिल्याचे कबूल केले.
पथकाने अभिषेक महेश तळेगावकर याचा शोध घेतला असता त्याने सदरचे सोने सोमवार पेठ, पुणे येथील सोनाराकडे विकल्याची माहिती दिली.तपास पथकाने पुणे येथील सोनाराकडून १५ लाख ३ हजार ४२५ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दयावान उर्फ मनोज बाळासाहेब साठे, (वय २५, रा.गोरडवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर), अजय उर्फ भोऱ्या उर्फ भोल्या बाळु देवकर, (वय २२, रा.कौठेयमाई, ता. शिरूर, जि.पुणे), योगेश अंकुश कडाळे, वय २७, रा.धामणी, लोणी, ता. आंबेगाव,जि.पुणे), आकाश ठकाराम दंडवते, (वय २८, रा. मलठण, ता. शिरूर, जि. पुणे),असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.
त्यांच्याकडून ३० हजार रुपयांचा गावठी कट्टा व २ जिवंत काडतुसे असा एकूण ९२ हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला आहे.तर धोंडया महादु जाधव (फरार), मन्ना उर्फ सुरजसिंग उर्फ अजयसिंग (रा. पंजाब (फरार) या दोघांचा पोलिसांद्वारे शोध चालू आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपुरचे अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबमें, संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.