स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देताच प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) दखल घेऊन पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात येऊन मार्ग काढण्याचे पत्र संघटनेला दिले आहे.

त्यामुळे सोमवारी (दि. १६) होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती संघटनेच्यावतीने देण्यात आली आहे.साखर कारखान्यांचा गळीत हंगामास सुरुवात होऊनही कारखान्यांनी ऊस दर जाहीर केले नाहीत.

इतर विविध मागण्यांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेवगाव तहसीलदारांसह विविध संबंधित विभागांना निवेदन दिले होते.निवेदनाची दखल घेऊन शेवगाव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

परंतु, तहसील कार्यालयातील यंत्रणेच्या गलथान कारभारामुळे संबंधित अधिकारी,साखर कारखान्यांना बैठकीचे निमंत्रण दिले गेले नाही.त्यामुळे नियोजित बैठक रद्द झाल्याने स्वाभिमानी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत शेवगाव तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करून निषेध व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

या आंदोलनाची दखल घेऊन प्रादेशिक सहसंचालकांनी जिह्यातील सर्व साखर कारखान्यांना सूचित ऑनलाइन आली. करण्यात येऊन बैठक घेण्यात तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात येत्या आठवड्यात सर्व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, संबंधित प्रशासकीय अधिकारी, शेतकरी संघटना यांची एकत्रित बैठक घेणार असल्याचे सहसंचालक संतोष बिडवई यांनी पत्राद्वारे कळविले.

तूर्तास आंदोलन स्थगित करून प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन स्वाभिमानी संघटनेला केली आहे.पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीकडे शेतकरी संघटना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.