शुभम उर्फ शिवम उर्फ मडक्या मारूती धुमाळ (रा. त्रिमुर्ती चौक, सारसनगर) या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि.१८) राहत्या घरातून त्याच्या मुसक्या आवळून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या सराईत गुन्हेगाराला गुन्हेगारी कारणांमूळे नगर शहरातून २ वर्षाकरीता हद्दपार केले होते.पण त्याने सोमवारी हद्दपारी आदेशाचा भंग करून पुन्हा नगरमध्ये पाऊल टाकले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांना नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना चेक करुन, हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्याविरूध्द कारवाई करण्याचे आदेश दिले होते
त्या नुसार पो.नि. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार रविंद्र पांडे, सुरेश माळी, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, भाऊसाहेब काळे, जालींदर माने, फुरकान शेख, प्रशांत राठोड यांचे पथक नेमून त्यांना कारवाईचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पथक नगर शहरामध्ये हद्दपार गुन्हेगारांना चेक कर त असताना गोपनीय माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार शुभम उर्फ मडक्या मारूती धुमाळ हा त्याचे राहते घरी आलेला आहे.
ही माहिती मिळताच पथकाने सारसनगर येथील त्याच्या राहते घरी जाऊन शोध घेत त्यास ताब्यात घेतले.त्याच्या विरुध्द भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
अशीच दुसरी घटना देखील भिंगार मधून समोर आली आहे.आन्या उर्फ आनंद राजेंद्र नायकू (रा. नेहरू चौक, माळगल्ली, भिंगार) या इसमाला नगर जिल्ह्यातून १ वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले होते.हद्दपारी आदेशाचा भंग करून भिंगार मध्ये आलेल्या यास भिंगार कॅम्प पोलिसांच्या पथकाने अंतिम चौक, पाटील गल्ली, भिंगार येथे सापळा लावून पकडले आहे.
पोलिसांची चाहूल लागल्यावर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स.पो.नि. जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे, चंद्रकांत माळोदे, पो.हे.कॉ. दीपक शिंदे, संदीप घोडके, रवि टकले, प्रमोद लहारे, समीर शेख, अमोल आव्हाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.