नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईला थर्टी फर्स्टचे वेध लागले आहेत.पार्टीसाठी पहाटे एक वाजेपर्यंत मुभा असल्याने पहाटे पर्यंत हॉटेल्स, बार सुरू राहणार आहेत.थर्टी फर्स्टच्या धांगड धिंग्यावर पोलिस, राज्य उत्पादन शुल्क तसेच अन्न व औषध प्रशासनाची नजर राहणार आहे.रात्रीची गस्त घालण्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
शहरासह जिल्ह्यातील तरुण नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.सोशल मीडियावर थर्टी फर्स्टच्या तयारीबाबत चर्चा सुरू आहे.शासनाने थर्टी फर्स्टसाठी पहाटे एक वाजेपर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
त्यामुळे पहाटे एक वाजेपर्यंत पार्टी सुरू राहणार आहेत.३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यातील हॉटेल्स सजले आहेत.ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही हॉटेल चालकांनी विद्युत रोषणाई, डीजे, लाइव्ह गाण्यांचे शो आयोजित केले आहेत.
दोन जणांसाठी दीड हजारा पासून पाच हजार रुपयांपर्यंत शुल्क असणार आहे.३१ डिसेंबर रोजी शहरासह ग्रामीण भागातील हॉटेलमध्ये पाट्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.या पार्ट्यांवर अन्न व औषध प्रशासनाची नजर असणार आहे.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना तशा सूचना करण्यात आलेल्या आहेत.त्यांच्याकडून हॉटेलची तपासणी केली जाणार असून, अन्न पदार्थांचे नमुने घेऊन प्रयोग शाळेत पाठविले जाणार आहेत.असुरक्षित अन्नपदार्थ आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.
शहरासह जिल्ह्यात मद्य पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते.अशा पार्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ८ पथके स्थापन करण्यात आली आहेत.या पथकांकडून जिल्ह्यातील हॉटेलची तपासणी करण्यात येणार असून,कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
मद्य पिण्यासाठी एक दिवसाचा परवाना घेण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.तरीही अनेकजण परवाना घेत नाहीत.विनापरवाना दारू पिताना आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील मद्याची किरकोळ व ठोक विक्री केल्या जाणाऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.राज्य उत्पादन शुल्क विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.या कक्षातून दारू विक्री केली जाणारे हॉटेल्स, बार, पार्टीवर नजर ठेवली जाणार असून, गैरप्रकार आढळून आल्यास कारवाया केल्या जाणार आहेत.
येत्या ३१ डिसेंबर रोजी अनेक ठिकाणी पार्टीचे आयोजन करण्यात येत असते.हॉटेल मधून विक्री केल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांची तपासणी करण्याच्या सूचना अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत असे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सोपान इंगळे यांनी सांगितले.