राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य कृषी, शिक्षण व संशोधन संचालकांमध्ये १० वर्षांपासून एकाच पदावर असलेले संचालक डॉ. हरिहर कौसडीकर कृषी परिषदेतून कार्यमुक्त करणेबाबत पत्र देऊनही महासंचालक कारवाई करीत नाहीत.

त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी कृषी परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा ईशारा दिला आहे. जाधव यांनी महासंचालक रावसाहेब भागडे यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले की, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील प्राध्यापक डॉ. हरिहर कौसडीकर हे कृषी परिषदेमध्ये संशोधन संचालक म्हणून १० वर्षांपासून कार्यरत आहेत.

यासह शिक्षण संचालक, विस्तार संचालक हे दोन पद त्यांच्याकडेच आहे.तिन्ही पदांवर कार्यरत असताना डॉ. कौसडीकर यांच्यावर अनेक तक्रारी झालेल्या आहेत.कृषी परिषदेत आल्यापासून डॉ. कौसडीकर यांनी कृषी परिषदेत इतर संचालकांना टिकू दिले नाही.

विद्यापीठाने संचालक पदावर अधिकारी दिला तरी त्यास रूजू करून घेतले गेले नाही.महासंचालकांची दिशाभूल करणे, सर्व पदभार आपल्याकडेच ठेवणे, कृषी मंत्री नियुक्त होताच त्यांची प्रथम भेट घेत महासंचालक यांना अंधारात ठेवत समांतर कारभार करण्याचा प्रयत्न अशा अनेक तक्रारी डॉ. कौसडीकर यांच्याबाबत आहेत.

तसेच संचालक (शिक्षण) पदावर असताना खाजगी शिक्षण संस्थांशी लागेबांधे करून, गैरव्यवहारी करून त्यांच्याबाबत असलेल्या तक्रारी दडपणे, त्या संस्थांचे मुल्यमापण चुकीच्या पद्धतीने करून त्यांना पाठीशी घालणे,अशा बाबी असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

कृषी परिषदेत डॉ. कौसडीकर यांना एकाच पदावर सलग १० वर्ष ठेवण्याबाबत नेमका पाठीराखा कोण ? महासंचालक भागडे यांचा कालावधी तसेच तक्रारी दिसत नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचे कुलसचिव यांच्याकडून सहा वेळा कृषी परिषदेला डॉ. कौसडीकर यांना कार्यमुक्त करणेबाबत पत्रव्यवहार करण्यात आले आहेत.

परंतु तरीही कृषी परिषदेचे महासंचालक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलसचिव यांच्या पत्राला केराची टोपली दाखवित असल्याने शंका कुशंका वाढल्या आहेत.

महाराष्ट्र कृषी, शिक्षण व संशोधन कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब बागडे हे शिस्तप्रिय आहेत.चुकीच्या कामकाजाला ते पाठीशी घालणार नाही.

विधानसभा अधिवेशनासाठी ते नागपूर येथे कामकाज पाहत आहे.अधिवेशन आटोपताच तक्रारींची दखल घेत डॉ. कौसडीकर यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल,अशी माहिती कृषी परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार यांनी दिली.

राज्यातील कृषी विद्यापीठातील तक्रारींचे निरसण करीत भ्रष्टाचार विरहित कामकाज तसेच शेती, शिक्षण संशोधनाला चालना देण्याचे काम संबंधित कृषी परिषदेमार्फत चालते.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बांधकाम विभागातील अभियंता मिलींद ढोखे यांच्याबाबत भ्रष्टाचाराच्या तक्रारी तसेच इतर गंभीर तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे.

तक्रारींचा निपटारा होत नसल्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कारभार वादग्रस्त ठरत असल्याचे मत तक्रारदार बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केले आहे.