नागपूर-मुंबई हायवे रस्त्यावर तालुक्यातील संवत्सर येथील गोदावरी नदीवरील पुलावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे.त्यामुळे वाहन धारकांना कसरत करून ये-जा करावी लागत आहे.पुलाच्या दोन्ही बाजूनी विविध झाडे झुडपे व वेड्याबाभळी वाढलेल्या आहेत.

त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव-संवत्सर गावानजीक असलेल्या गोदावरी नदीवरील पुलाची खड्‌ड्यांमुळे दुरावस्था पाहायला मिळत आहे.पूलाच्या एका बाजूला लावलेला फलकही तेथून गायब झालेला आहे.

तर एका बाजूस फलक आहे त्यावर अंधुक व अस्पष्ट माहिती पाहायला मिळते.त्यावरील माहितीनुसार पुणे येथील एका एजन्सीद्वारे स्टेट रोड डेव्हलपमेंट अंतर्गत सदरचा पूल २००४ साली सुमारे तीन कोटी साठ लाख रुपये खर्चुन बांधला आहे.

मात्र,आता या पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन धारकांना कसरत करून आपली वाहने चालवावी लागत आहे.रात्रीच्या वेळी तसेच दिवसाही हे खड्डे दिसून न आल्याने वाहने मोठ्या प्रमाणावर खड्ड्यात आदळतात.

त्यामुळे पुलाला मोठे हादरे बसतात.पर्यायाने वाहनाचेही मोठे नुकसान होते.खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात कधी-कधी अपघात देखील होतात.एवढ्या मोठ्या प्रमाणावर या पुलाची दुरावस्था झाली.तरीही संबंधित विभाग ते दुरुस्त करण्यासाठी लक्ष देत नाही.

त्यामुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे.पूल ज्या ठिकाणापासून सुरुवात होतो.त्या दोन्हीही बाजूला लिंब, रुई, वेड्या बाभळी व इतर झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहे.ही मुळे खोलवर गेल्याने पुलाला भविष्यात धोका उद्भवण्याची शक्यता आहे.

मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूंनी वेड्याबाभळी वाढल्याने समोरून येणारे वाहन रात्री दिसत नाही.पर्यायाने वाहनधारकात भीती व्यक्त होत आहे.हा पूल मुंबई-नागपूर हायवेवर असल्याने सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे.

या पुलावर उभे राहिले असता, वाहन ज्यावेळेस ये-जा करते त्यावेळेस हादरे बसतात.पूलाच्या दोन्ही बाजूला वाढलेली झाडेझुडपे त्वरित काढून वाहनधारकांना दिलासा द्यावा व पूलावर पडलेली खड्डे त्वरित बुजवावी,अशी मागणी वाहनधारक व नागरीकांकडून केली जात आहे.