शासनाने कापसाला ७ हजार पाचशे रुपये हमीभाव जाहीर केलेला असला तरी खुल्या बाजारात ६ हजार ८०० ते ६ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.सरकारने कापूस उत्पादकांना चांगला भाव देऊन शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावे,अशी मागणी शहरटाकळी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली.पीक जोमात असताना अवकाळीने झोडपून काढल्याने पांढरे सोने काळवंडले होते.कापसाला बऱ्यापैकी भाव मिळून परिस्थिती सुधारेल,ही अपेक्षा शेतकऱ्यांना होती.
शासनाने कापसाला ७ हजार ५२१ रुपये हमीभाव ठरवून सीसीआय केंद्रामार्फत खरेदी सुरू केली.मात्र, त्याला अटी जास्त लावल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी त्रस्त झाले असून,त्यांनी खुल्या बाजारपेठेत कापस विक्रीला पसंती देत आहेत.
यंदा कापसाचे उत्पादन कमी निघाले असून, शासनाच्या हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्यामुळे उत्पन्न व उत्पादन खर्च, यांचा ताळमेळ बसत नाही. त्यात रब्बीची पेरणी कशी करावी, ही चिंता असून,शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे.
शासनाच्या हमीभाव योजनेच्या खरेदीसाठी पहिल्यांदा पीक पेरा असणे आवश्यक आहे, त्यानंतर सीसीआयकडे ऑनलाईन नोंद असणेही गरजेचे आहे.कापसात आठ टक्क्यांपेक्षा अधिक ओलावा नसावा.कवडीचे प्रमाण कमी असावे,अशा अनेक अटी लादल्याने शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे.