दिवाळी सणाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे.दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण.नागरिक प्रकाशोत्सव मोठा उत्साहात साजरा करतात.नेमका हाच सण पाथर्डी शहरवासियांना अंधारात साजरा करावा लागणार आहे,असे दिसते.
त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळातच नगरपरिषदेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.शहरातील पथदिवे बंद पडल्याने उपनगरांतील नागरिकांना अंधारात चाचपडावे लागत आहे. त्याकडे मात्र पाथर्डी नगरपरिषदेकडून दुर्लक्ष होत आहे.
शहरातील बहुतेक उपनगरांमधील पथदिवे बंद असल्याने सायंकाळी सातनंतर नागरिकांना अंधारातच राहावे लागते.सार्वजनिक रस्ता व ठिकाणांवरी पथदिवे सुरू नसल्याने मुलींच्या छेडछाडीसह चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे, छोट्या-मोठ्या भुरट्या चोऱ्याही होत आहेत.
शहरातील आनंदनगर वामनभाऊनगर, एडके कॉलनी,शिवशक्तीनगर, आसरानगर, फुलेनगर या उपनगरांसह शहरातील प्रमुख रस्त्यांवरील काही भागातील काही पथदिवे बंदच असल्याने अंधारातून वाट काढावी लागत आहेत.
ज्या ठिकाणी पथदिवे नाहीत,अशा उपनगरांतील काही भागात सायंकाळी साडेसहानंतर बाहेर पडण्यासाठी नागरिकांना भीती वाटते. महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणीही कधी पथदिवे चालू असले तरी ते अचानक बंद पडतात.
नादुरुस्ती होऊन वीज प्रवाह अचानक लोखंडी खांबांमध्ये उतरल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. आशा परिस्थितीत नगरपरिषदेकडून या प्रकाराची गांभीर दखल घेतली जात नाही.
शहरातील शेवगाव रस्त्यावरील कोठारी घरापासून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गेल्या सहा महिन्यांपासून एकही विजेच्या खांबावर बल्ब चालू नाही. त्यामुळे या परिसरातही अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.पथदिव्यांची नादुरुस्ती झालेला भाग वारंवार तक्रारी करून सुद्धा वेळेवर तेथे दुरुस्ती होत नाही.
घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर भरमसाठ वाढले. मात्र, नागरिकांना सुविधा त्या तुलनेत मिळत नाहीत.शहरातील अत्यंत महत्त्वाचा बारामती-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इंदिरानगर ते नगर रस्त्यापर्यंतच्या विजेच्या खांबावर एकही दिवा सुरू नसतो.त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.
त्यामुळे शहरात आहे की एखाद्या खेडेगावात असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. उपनगरातील काही भाग अंधारात, तर काही भाग प्रकाशात अशी परिस्थिती सध्या आहे.प्रशासनाने सार्वजनिक वीजप्रश्न गांभीयनि सोडवावा, अशी मागणी नागरिकांनी नगरपरिषदेकडे केली आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहर व उपनगरांतील पथदिव्यांची त्वरित दुरुस्ती करून प्रकाश निर्माण केला जाईल.अशा सूचना संबंधितांना दिल्याचे संतोष लांडगे (मुख्याधिकारी, पाथर्डी नगरपरिषद) यांनी सांगितले आहे.