ज्येष्ठ उद्योगपती,पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनाने सामाजिक दातृत्व जपणारं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. उद्योग क्षेत्रामध्ये भारताचे नाव संपूर्ण विश्वात पोहोचविणारे एक अनमोल रत्न म्हणून त्यांची ओळख होती.
कोव्हीड संकटात देशाला ५०० कोटींची त्यांनी केलेली मदत ही स्मरणात राहणारी आठवण असल्याची भावना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
याबाबत दिलेल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे की, उगद्योगपती रतन टाटा यांनी उद्योग क्षेत्रामध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करताना काही आदर्शही सर्वांच्या समोर ठेवले होते.
देशाच्या औद्योगिक प्रगतीमध्ये टाटा परिवाराचे योगदान खुप महत्वपूर्ण राहिले. या उद्योग समुहाला पुढे घेवून जाताना एक मार्गदर्शक म्हणून रतन टाटा यांनी बजावलेली भूमिका ही पालकत्वाची राहिली.
माणूस कितीही मोठा झाला तरी, सामाजिक जाणिवा विसरायच्या नसतात हा संदेश रतन टाटा यांनी आपल्या वृती आणि कृतीतून दिला, याची आठवण सांगताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, संपूर्ण देश कोव्हीड संकटाला सामोरा जात असताना या प्रसंगामध्ये टाटा समुहाच्या माध्यमातून देशाला ५०० कोटींची मदत देवून सामाजिक दायित्व त्यांनी निभावले, ही आठवण सदैव स्मरणात राहणारी ठरेल, असे ना. विखे पाटील यांनी म्हटले आहे.