निवडणूक जवळ आल्यावर प्रशासनावर आणि पोलीस खात्यावर ताण वाढतो.पोलिसांना या काळात विविध ठिकाणी बंदोबस्ताला जावे लागते त्या शिवाय इतरही रोजची कर्तव्ये पार पाडावी लागतात.त्यामुळे पोलिसांना सध्याच्या घडीला २४ तास ड्युटी करावी लागत असल्याचे चित्र आहे.
निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर निवडणूक यंत्रणेप्रमाणेच पोलिसांवरचा सुद्धा कामाचा ताण आणखी वाढतो.प्रचार चालू असताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतात.
सत्ताधारी किंवा विरोधकांचा स्टार प्रचारक, मोठा नेता किंवा अभिनेता किंवा मंत्री येणार असेल,तर अशा नेत्यांच्या बंदोबस्ताची विशेष काळजी घ्यावी लागते. तेथे घातपातविरोधी पथकाकडून तपासणी, व्हीआयपींची सुरक्षाही पोलिसांना करावी लागते.
याशिवाय दोन वेगवेगळ्या पक्षांच्या रॅली,सभा एकाचवेळी एका ठिकाणी आमने-सामने येऊ नयेत म्हणूनही काळजी घ्यावी लागते. त्यासाठी संबंधित पोलीस अधिकारी तसेच वरीष्ठ पोलीस निरीक्षक अभ्यास करतात.
सभेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताची नियुक्ती करणे, सभा शांततेत पार पडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, म्हणून बंदोबस्ताची आखणी पोलिसांना करावी लागते.
मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदारांव्यतिरीक्त मतदान प्रतिनिधीं व्यतिरीक्त राजकीय पक्षांपैकी कोणीही १०० मीटरच्या आत येऊ नये म्हणून विशेष लक्ष ठेवावे लागते.
यावरून पोलीस आणि राजकीय कार्यकत्यांमध्ये किंवा दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्येही वाद उद्भवतात.हे वाद उफाळू नये म्हणून बंदोबस्तावरील पोलिसांना सतत लक्ष ठेवावे लागते.
मतदानाच्या वेळी या ईव्हीएम मशीन सुरक्षितरित्या मतदानकेंद्रावर आणणे, तिथून त्या परत स्ट्रॉगरूममध्ये नेण्याचे जोखमीचे कर्तव्य बजवावे लागते.
ईव्हीएमची सुरक्षा हाही या बंदोबस्तामधील महत्वाचा भाग असतो.मतदानाच्या काही दिवस आधी या मशीन जिल्हाधिकारी कार्यालयात येतात.
तिथेही पोलिसांचा खडा पहारा असतो. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर मतमोजणी होते. तेव्हा मतदान ते मतमोजणी या काळातही या ईव्हीएमची पोलिसांना विशेष काळजी घ्यावी लागते.
राजकीय गुन्हेगार नियंत्रणात राहाण्यासाठी त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्याची प्रक्रिया तसेच न्यायालयाने फरार घोषित केलेले गुंड, तडीपार गुन्हेगार, अभिलेखावरील गुन्हेगार यांची वेळोवेळी पडताळणी करून त्यांचा मागोवा घेत त्यांना अटक करण्याची कारवाई करावी लागते.
तसेच प्रचारासाठी बॅनरबाजी आणि हल्लीच्या काळात व्हाट्सअॅप, फेसबुक आणि ट्विटर किंवा समाजमाध्यमांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या वादग्रस्त पोस्ट यावर पोलिसांना बारीक नजर ठेवावी लागते.या सर्व गोष्टीची शहानिशा करून बेकायदा पोस्ट किंवा विधाने करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई किंवा नोटीस बजवावी लागते.
अनेकदा अनेक गुन्हेगार एखाद्या राजकीय नेत्याच्या किंवा राजकीय पक्षाच्या आश्रयालाही आलेले असतात.अशा वेळी कोणाचीही तमा न बाळगता त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांवरच असते.
या व्यतिरिक्त निवडणूक काळात कोणताही गैरप्रकार घडू नये,म्हणून दारू अड्ड्यांवर कारवाई तसेच वैयक्तिक सुरक्षेसाठी परवानाधारक शस्त्र घेणाऱ्यांची शस्त्रे संयुक्तिक कारण वगळता जमा करण्याची जबाबदारीही पोलिसांवरच असते.
निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी जल्लोषाच्या वातावरणात घोषणाबाजीमुळे पुन्हा जुने वाद उफाळून येण्याची शक्यता असते. त्यामुळेच निवडणुकीपूर्वी लोकांनी निर्भयपणे मतदान करण्यासाठी पोलिसांचे पथसंचलनही केले जाते.
निवडणुकांचा प्रचार सुरु होण्यापासून ते निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंत पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस अधिकारी किंवा अधीक्षक या पातळीवर सर्वच पोलीस हे डोळ्यांत तेल घालून ड्युटी वर हजर असतात.निवडणुकांच्या काळात या संपूर्ण कामाचा त्यांच्यावर प्रचंड ताण असतो.
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पोलिसांना जागृत राहून काम करावे लागते.तणाव वाढू न देता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच निकालानंतरही कोणताही वाद उफाळून येऊ नये म्हणून ही यंत्रणा सलग ३० ते ४८ तास कार्यरत असते.