नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने मोठा फटका बसला आहे.विशेषतः काढणीस तयार असलेल्या लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पावसात भिजल्यामुळे काढणीस आलेल्या कांद्याचा अक्षरशः ‘लाल चिखल’ झाला आहे.तालुक्यातील जेऊर पट्ट्यात सर्वाधिक नुकसान झाले असून, लाल कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर अवकाळीचे ‘पाणी’ फेरले गेले आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची लागवड करण्यात येत असते.शेतकऱ्यांना नगदी उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून लाल कांद्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे.कांद्याच्या लागवडीनंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या ढगाळ हवामान व धुक्यामुळे लाल कांद्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता.त्यामुळे लाल कांद्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पहावयास मिळत आहे.

एकरी उत्पादन अर्ध्यापेक्षाही जास्त घटले आहे.लाल कांद्याला बाजारभाव चांगला मिळत असला,तरी उत्पन्नात झालेल्या घटीचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर दिसून येत आहे.तालुक्यातील जेऊर पट्टा हा कांदा उत्पादनासाठी राज्यात ओळखला जातो.अनेक जिरायत क्षेत्र सिंचनाखाली आणत गेल्या दशकात शेतकऱ्यांनी लाल कांदा उत्पादनात विक्रमी वाढ केली आहे.

डोंगराळ व पाण्याचा निचरा होणारी जमीन लाल कांदा उत्पादनासाठी पोषक असते.त्यामुळे जेऊर पट्ट्यात लाल कांदा उत्पादन व कांद्याची गुणवत्ताही चांगली राहत असते.जेऊर परिसरात गुरुवारी (दि. ५) सायंकाळी, तसेच शुक्रवारी (दि. ६) सकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात काढून ठेवलेला लाल कांदा, तसेच काढणीला आलेल्या लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

काही शेतकऱ्यांचा लाल कांदा काढून विक्री झाला असला,तरी अनेक शेतकऱ्यांचा अद्यापही कांदा शेतातच पडून आहे.अशा शेतकऱ्यांना मात्र अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याचे पहावयास मिळते.तालुक्यातील इतर काही भागांत कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले असले, तरी जेऊर प‌ट्ट्यात मात्र मोठे नुकसान झाले.

काढणीला आलेल्या लाल कांद्याच्या गाभ्यात अवकाळी पावसाचे पाणी गेल्याने कांदा सडत आहे.तसेच भिजलेला कांदा तत्काळ बाजारात पाठवावा लागतो.परंतु भिजलेल्या कांद्यास योग्य तो बाजारभावही मिळत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.लाल कांदा लागवडीनंतर विविध रोगांनी ग्रासला गेला होता.

त्यामुळे कांद्याचे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून महागडी औषधांची फवारणी करण्यात आली होती.रोपांचीही पावसामुळे वाताहत झाली होती.मोठा खर्च करून लाल कांद्याचे उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला.परंतु अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षावर मात्र पाणी फेरले आहे.

जेऊर प‌ट्ट्यातील बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर, धनगरवाडी, डोंगरगण, पिंपळगाव माळवी, पिंपळगाव उज्जैनी, खोसपुरी,कापूरवाडी, शेंडी, उदरमल, पांगरमल परिसरात लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.तरी नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून तत्काळ आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी इमामपूरचे माजी सरपंच भीमराज मोकाटे यांनी केली.

सुमारे दोन एकर कांदा काढून शेतात पडलेला आहे.अवकाळी पावसामुळे संपूर्ण कांदा भिजला आहे.भिजलेला कांदा सडण्याची शक्यता निर्माण झाली असून, तत्काळ बाजारात पाठवावा लागणार आहे. परंतु भिजलेल्या कांद्याला बाजारात भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी मोठा आर्थिक अडचणीत सापडला आहे.

लाल कांदा काढणीला आलेला आहे.अवकाळी पावसामुळे कांदा भिजला असून, शेतातच सडणार आहे. लाल कांद्यासाठी साधारणपणे एकरी ७० हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.हवामानातील बदलाचा फटका उत्पन्नाला बसला आहे.त्यातच अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. झालेला खर्च देखील वसूल होणार नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.