३ नोव्हेंबर २०१५ रोजी शासनाने आदेश जारी करून रब्बी गावांत खरीप हंगामामध्ये २/३ किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी केली असेल, तर त्या रब्बी गावांमध्ये खरीप हंगामात सुधारित पैसेवारी घोषित करण्याची तरतूद असल्याचे नमूद केले आहे.

या तरतुदीनुसार तहसीलदारांनी आपापल्या तालुक्यातील रब्बी गावांमधील खरीप हंगामी पिकांची सुधारित पैसेवारी जाहीर केली आहे. त्यामुळे १ हजार २१ रब्बी गावांतील खरीप पिकांची पैसेवारीदेखील ५० पैशांपेक्षा अधिक असल्याचे जाहीर करण्यात आले.

जिल्ह्यातील ५८५ गावांतील सन २०२४-२५ मधील खरीप पिकांची पैसेवारी ५० पेक्षा अधिक आली आहे. तसेच १ हजार २१ रब्बी गावांतील पिकांची पैसेवारीही ५० पेक्षा अधिक आहे.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी खरीप हंगामातील पिकांची सुधारित पैसेवारी जाहीर केली. त्यावरून जिल्ह्यातील खरीप हंगामी सर्वच पिके जोमात असल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात एकूण १ हजार ६०६ महसुली गावे आहेत. त्यापैकी ५८५ गावे खरीप हंगामासाठी तर १ हजार २१ गावे रब्बी हंगामात समाविष्ट आहेत. पिकांची पेरणी झाल्यानंतर उगवण कशी झाली, याची चाचपणी नजर अंदाज पैसेवारीतून काढली जाते.

सप्टेंबरमध्ये नजर अंदाज पैसेवारी जाहीर केली जाते. यंदा जून व जुलै महिन्यात दमदार पावसाची नोंद झाली. त्यामुळे खरीप पिकांची सर्वत्र उगवण झाली. त्यामुळे नजर अंदाज पैसेवारी ५० पेक्षा अधिकची नोंद झाली.

त्यानंतर ३१ ऑक्टोबरमध्ये खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जाहीर झाली. ही पैसेवारी देखील ५८५ गावांत ५०पेक्षा अधिक असल्याचे जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, अंतिम पैसेवारी १५ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. या वेळी ज्या गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी असेल, त्या गावांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली जाते.