शनिवार,रविवार शासकीय सुट्टी असल्यामुळे व त्यातच सरत्या वर्षाला अवघे अट्ठेचाळीस तास शिल्लक राहिलेले असताना नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत साई दर्शनासाठी विविध राज्यातून आलेल्या साईभक्तांनी तोबा गर्दी केली आहे.

मात्र,पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे शिर्डीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने भाविकांना तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना या गर्दीमुळे मोठा मनःस्ताप सहन करावा लागला.

शिर्डीत झालेल्या भाविकांच्या गर्दीमुळे साईसंस्थान भक्ती निवास तसेच खासगी लॉजिंग व हॉटेल तसेच साई प्रसादालय भाविकांच्या गर्दीने हाउसफुल झाल्याचे दिसून आले.वर्षाअखेर आणि नववर्षाच्या आगमनाच्या उत्सवात साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी उमडली आहे.

देशभरातून लाखो भाविक साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत आहेत.वर्षाखेर, वर्षारंभ, सुट्टया त्यातच वर्षातील अखेरचा रविवार असल्याने साईबाबा मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.

मंदिराच्या पवित्र वातावरणात साईबाबांच्या दर्शनासाठी उभारलेल्या दर्शन रांग कॉम्प्लेक्समध्ये भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.साईसंस्थानने भाविकांच्या सुविधांसाठी विशेष व्यवस्था केली आहे.अनेक पदयात्री साईबाबांच्या पालख्या घेऊन साईनगरीत दाखल होत आहेत.

त्यामुळे अवघी साईनगरी साईनामाने दुमदूमून गेली आहे.साईमंदिरालगतच्या नगर-मनमाड महामार्गावरील जड वाहतूक रिंगरोडने वळविण्यात आली असली तरी वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे.पोलीस, गृहरक्षक दलाचे जवान जागोजागी तैनात करण्यात आले आहेत.

शिर्डीत आलेल्या भाविकांमध्ये नववर्षाचा उत्साह दिसून येत आहे.अनेक भाविक वर्षाखेरीस साईबाबांकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि नवीन वर्षाकरीता आशिर्वाद प्राप्त करण्याकरीता लाखो भाविक दरवर्षी या काळात साईनगरीला भेट देत असतात.

साईसंस्थानकडून मंदिर परिसरालगत असलेल्या शताब्दी मंडपात सालाबादप्रमाणे दि.२९ डिसेंबर ते १ जानेवारी या चार दिवसांच्या काळात शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यात विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे.

नववर्षानिमित्त साई मंदिर ३१ डिसेंबर रोजी रात्रभर भाविकांसाठी खुले राहणार असल्याचे संस्थान सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले साईबाबा संस्थान, नगरपरिषदेने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर पावले उचलली आहेत.

मंदिर परिसरात व शहरातील गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच, भाविकांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था उभारण्यात आली आहे.साईसंस्थानच्या भक्तनिवास, प्रसादालयातही भाविकांची गर्दी दिसत असून खासगी हॉटेलातही भाविक गर्दी करत आहेत.

साई दर्शनासाठी भाविकांनी तोबा गर्दी केली.मात्र या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिर्डी वाहतूक शाखेचे पोलीस कुचकामी ठरले.शनिवार व रविवारी शिर्डी शहरातील नगर-मनमाड महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याने वाहन चालकांना मोठा मनः स्ताप सहन करावा लागला.

शहरात महामार्गावर मोठ्या प्रमाणात लक्झरी बसेस व अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहन व रिक्षा चालकांनी बेशिस्तपणे वाहन रस्त्याच्या कडेला उभी केल्यामुळे व पोलिसांचे यावर कुठलेही नियंत्रण नसल्याने शिर्डीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.या वाहतूक कोंडीवर कायम स्वरूपी उपाय करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.