राहाता तालुक्यातील वाकडी,चितळी,धनगरवाडी आणि परिसरातील शेतकरी सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. रात्रीच्या वेळेस शेतीला होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतात मोटार चालवण्यासाठी जाणे त्यांच्यासाठी जीवघेणे ठरत आहे.

या क्षेत्रात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रात्रभर वीजपुरवठा मिळाल्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते.मात्र, बिबट्याच्या भीतीने जीव धोक्यात घालून शेतात जाणे शक्य होत नाही.

त्यामुळे पाणीपुरवठा वेळेवर न झाल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे.महावितरणच्या व्यवस्थापनातील त्रुटीमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळत नाही.कमी दाबाच्या विजेमुळे दिवसा मोटारी सुरू करणे कठीण झाले आहे.

परिणामी,रात्रीच वीज पुरवठा केला जात आहे,परंतु बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे रात्री शेतात जाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.शेतकऱ्यांनी महावितरणकडे दिवसा वीज पुरवठ्याची मागणी वेळोवेळी केली आहे.

परिसरात बिबट्याच्या वावरामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकरी दोघेही भयभीत आहेत.बिबट्याच्या भीतीने रात्री घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.वन विभागाने तातडीने पावले उचलून बिबट्याचा बंदोबस्त करावा,अशी मागणी होत आहे.

वन विभागाने बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याच्या सुरक्षित पुनर्वसनाची कार्यवाही करावी,अशी मागणी नागरिकांकडून जोर धरली जात आहे.

वाकडीतील एका शेतकऱ्याने आपल्या परिस्थितीचा आक्रोश व्यक्त करत सांगितले की,आमचं जीवन शेतीवर अवलंबून आहे;मात्र विजेच्या व्यवस्थेमुळे आमचं जीवन धोक्यात आलं आहे.

दिवसा वीज पुरवठा झाला तरच शेती व्यवस्थित पार पडेल आणि बिबट्याच्या धोक्यापासूनही सुटका मिळेल.’शेतकऱ्यांची सुरक्षितता’ आणि ‘शेतीचे रक्षण’ हे प्रशासनाच्या प्राथमिकतेत असावे.दिवसा वीज पुरवठ्याचे नियोजन आणि बिबट्याच्या दहशतीवर उपाययोजना यामुळेच या संकटातून सुटका होऊ शकते.

शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देत,महावितरणने दिवसा वीज पुरवठ्यासाठी नियोजन करावे,अशी अपेक्षा आहे.त्याचबरोबर वन विभागाने बिबट्‌याच्या वावरावर नियंत्रण मिळवून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी.

शेतकऱ्यांची समस्या गंभीर असल्याने प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत,अशी मागणी वाकडी व परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी केली आहे.