वडाळा बहिरोबा येथील प्रवाशांची चढ-उतार करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या एसटी बसेस नियमितपणे थांबविण्याच्या मागणीसाठी आज बुधवारी (दि. १८) अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गांवर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा काँग्रेसच्या परिवहन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदिप मोटे यांनी दिला आहे.
याबाबत मोटे यांनी राज्य परिवहन मंडळाच्या अहिल्यानगर तसेच छत्रपती संभाजीनगर विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात,सर्व प्रकारच्या एसटी बस गाड्यांसाठी सर्वात जुना बस थांबा असलेल्या वडाळा बहिरोबा येथे थांबून प्रवाशांची चढ उतार करण्यास चालक वाहकांकडून गेल्या काही महिन्यांपासून टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार केली आहे.
या मार्गावरून धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या निर्जन ठिकाणी परवानगी नसलेल्या ढाब्यावर चहा, पाणी, नाश्ता, जेवणासाठी असुरक्षितरित्या थांबत असल्याकडे त्यांनी विभाग नियंत्रकांचे लक्ष वेधले आहे.
एसटी बसच्या चालक वाहकांना या ढाब्यावर फुकटात चहा, पाणी, नाश्ता, जेवण दिले जात असल्याने प्रवासी हिताला तिलांजली देऊन तेथे प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत आहे.
एसटीच्या चालक-वाहकांना फुकटात चहा, पाणी, नाश्ता, जेवण दिले जात असल्याने या ढाबा चालकांकडून सामान्य प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लुट केली जात असल्याची बाब त्यांनी विभाग नियंत्रकाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
या ढाब्यावर थांबता,यावे यासाठी वडाळा बहिरोबा येथून प्रवासी चढ-उतार करण्यास स्पष्टपणे टाळाटाळ करून वडाळा बहिरोबा येथे थांबाच नसल्याचे बेजबाबदार उत्तर दिले जात असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
त्यामुळे सर्व प्रकारच्या बस गाड्या नियमानुसार नियमितपणे वडाळा बहिरोबा येथील थांब्यावर न थांबल्यास आज बुधवारी (दि. (दि १८) अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर तिव्र रास्ता रोको करणार असल्याचा इशारा मोटे यांनी दिला आहे.
पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, शिर्डी, शेवगाव येथे जाण्यासाठी वडाळा येथे विविध गावातील प्रवासी, विद्यार्थी, महिला येतात. या पुर्वी वडाळा येथे बांधकाम असलेले बस स्थानक होते.
ते बस स्थानक सध्या अस्तिवात नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांना ऊन, वारा व पावसाचा त्रास सहन करावा लागत असून एसटी बस कुठे थांबते तिकडे सामान घेऊन धावपळ करावी लागते.