बुधवारी २० तारखेला विधानसभा निवडणूक पार पडली असून मतदारांची जबाबदारी संपली.पण मात्र त्या नंतर निवडणूक कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची तशीच प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे.

निवडणूक झाल्यावर ईव्हीएम मशिन्सच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनावर आणि पोलिसांवर तसेच निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यावर असणार आहे.जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत हि जबाबदारी कायम राहणार आहे.

बुधवारी रात्री उशिरापर्यंत मतदान कर्मचाऱ्यांनी कोपरगाव येथील सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल कॅम्पस मधील स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन सुरक्षितपणे जमा केल्या आहेत,अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, येथील २१९ कोपरगाव विधानसभा जागेवरील मतदान शांततेत पार पडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मतदान कर्मचारी सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये पोहोचले.येथे मतदान पक्षांच्या कागदपत्रांसह ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन स्ट्रॉग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत.

या ठिकाणी मशिन्स थ्री लेयर सुरक्षतेत ठेवण्यात आल्या आहे.त्यानंतर स्ट्राँग रूम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.स्ट्राँग रूममध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.शिवाय स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाचे जवान २४ तास तैनात आहे.

स्ट्राँग रूमच्या मुख्य गेटवर निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत.ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे.येथे सुरक्षा दल तैनात करण्यात आलेले आहे.सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीसोबतच ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेबाबत लेखी नोंदी देखील ठेवल्या जातील.

सुरक्षा अधिकाऱ्यांसह राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या हालचालींचीही लेखी नोंद ठेवली जाणार आहे. उद्या (दि. २३) नोव्हेंबर रोजी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे,त्याच दिवशी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम उघडण्यात येणार आहे,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत यांनी दिली आहे.